
रत्नागिरी ः जिल्ह्यात हेल्मेट सक्ती नको जनजागृती करा
हेल्मेट सक्ती नको, जागृती करा
पालकमंत्र्यांचे आदेश; पुणे, कोल्हापूरचा दिला दाखला
रत्नागिरी, ता. ५ : मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये हेल्मेट सक्ती नाही; परंतु ७५ हजारांची लोकवस्ती असलेल्या रत्नागिरी शहरात हेल्मेट सक्ती का? त्यापेक्षा तुम्ही शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रम घ्या आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करा. हेल्मेट वापरले पाहिजे, परंतु सक्ती करू नका, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिले.
परिवहन कार्यालयाने २ जूनला याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले होते. जिल्ह्यात दुचाकीच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये मृतांचीही संख्या अधिक म्हणून पहिल्या टप्प्यात शासकीय, निमशासकीय, मोठ्या खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे; तसेच दुचाकीच्या मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती करण्यात आल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. जिल्ह्यात पुन्हा हेल्मेट सक्ती होणार, या विचाराने दुचाकीधारकांमध्ये नाराजी होती. याबाबत काय निर्णय होणार, कधीपासून अंमलबजावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष असताना पालकमंत्री सामंत यांच्या जनता दरबारामध्ये याबाबतचा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा सामंत यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांना हेल्मेट सक्तीबाबत विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘परिवहन कार्यालयाकडून तसा आदेश आला आहे. तो आम्ही पुढे पाठवला.’ यावर, ‘साहेब, पुणे, कोल्हापूर ही शहरे तरी निश्चितच मोठी आहेत. तिथे हेल्मेट सक्ती नाही; पण रत्नागिरीसारख्या ७५ हजार लोकवस्ती असलेल्या शहरात हेल्मेट सक्ती का? सुरक्षेच्यादृष्टीने दुचाकीधारकांनी हेल्मेट वापरले पाहिजे; परंतु सक्ती करू नका. याबाबत शासकीय, निमशासकीय कार्यालये, पोलिस विभाग, मोठ्या खासगी संस्थांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम घेऊन त्यांना हेल्मेट वापरण्यास प्रवृत्त करा. परंतु हेल्मेट सक्ती नकोय’, असे स्पष्ट आदेश श्री. सामंत यांनी आरटीओंना दिले. कोणत्याही नियमाची अंमलबजावणी करताना थेट पत्र काढू नका. किमान याबाबत सर्वांशी चर्चा झाली पाहिजे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.