उमेदच्या महिलांना पालकमंत्र्यांकडून नवी उमेद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेदच्या महिलांना पालकमंत्र्यांकडून नवी उमेद
उमेदच्या महिलांना पालकमंत्र्यांकडून नवी उमेद

उमेदच्या महिलांना पालकमंत्र्यांकडून नवी उमेद

sakal_logo
By

उमेदच्या महिलांना पालकमंत्र्यांकडून नवी उमेद
खेळते भांडवल ३ लाखावर; मानधनात वाढीसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ग्वाही
रत्नागिरी, ता. ५ः उमेद योजनेअंतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज बैठकीत मोठे निर्णय घेत उमेदच्या महिलांना दिलासा दिला. प्रभागसंघांच्या सर्वसाधारण सभेला लागणारा खर्च १ वरून २ लाख केला. खेळते भांडवल ३ लाखावर नेले. महिलांचे मानधन १० हजार व्हावे, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करत जिल्ह्यातील उमेदच्या १ हजार ८१३ महिलांना स्मार्ट फोन देण्याची घोषणा पालकमंत्री सामंत यांनी केली.
महिला सक्षमीकरणामध्ये देशात महाराष्ट्र पहिला असेल आणि महाराष्ट्रात रत्नागिरी पॅटर्न लागू होईल असे त्याचे स्वरूप असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आणि उमेदच्या महिलांनी टाळ्यांची सलामी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहामध्ये उमेदच्या महिलांची आढावा बैठक सामंत यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पूजार उपस्थित होते. सामंत यांनी उमेदच्या महिलांना आपल्या अडीअडचणी मांडण्याच्या सूचना केल्या. केवळ ३ हजार मानधनामुळे येणाऱ्या अडचणी, वाढीव प्रवासखर्चामुळे आर्थिक अडचण, केवळ ३०० रुपये भत्ता असल्याने त्याचा फायदा होत नाही. अनेक महिलांकडे मोबाईल नसल्याने कामे करण्यात अडथळे येत आहेत. सर्वसाधारण सभा घेतल्यास त्याला असलेल्या लाखोंच्या मर्यादेमुळे खर्च भागत नाही, अशा अनेक समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.
पालकमंत्री सामंत म्हणाले, मी आज मुद्दाम बैठक बोलावली. कारण, तुम्हाला बोलावून रिकाम्या हाती पाठवण्यापेक्षा काहीतरी भरीव देऊन महिला सक्षमीकरणाचा रत्नागिरी पॅटर्न होईल, असे काही आज देणार आहे. प्रभागसंघांच्या सर्वसाधारण सभेच्या खर्चाची मर्यादा १ लाख होती. आजपासून आम्ही ती २ लाख करत आहोत. खेळते भांडवल ३ लाखावर नेले जाईल. महिलांना तुटपुंजे मानधन असल्याने अनेक अडचणी येत होत्या म्हणून त्यांना १० हजाराच्यावर मानधन करण्याबाबतचा निर्णय मुख्यमत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल; परंतु तुम्हाला आज शब्द देतो की, तुमच्या मानधनात वाढ दिली जाईल. मोबाईल नसल्याने अनेक महिलांना काम करताना अडचण येते. कोणा-कोणाकडे मोबाईल नाही की सरसकट सर्वांना द्यायचा, असे विचारले असता महिला म्हणाल्या हो, सर्वांना द्या. त्यामुळे जिल्ह्यातील उमेदच्या १ हजार ८१३ महिलांना स्मार्ट फोन देण्याची घोषणा सामंत यांनी केली. यात चांगले काम करणाऱ्या गटांनादेखील १० हजार, ७ हजार आणि ३ हजार असे बक्षिस देऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे. महाराष्ट्रत एक वेगळी चळवळ त्या निमित्ताने उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे भावनाप्रधान शासन असून, तुमच्या मागण्या मान्य करणारे शासन आहे. महाराष्ट्रात हा पॅटर्न राबवला जाईल, असे ते म्हणाले.

चौकट
दृष्टिक्षेपात
* जिल्ह्यात जलजीवन मिशनची ४०० कोटीची कामे
* १२ ते ३० दरम्यान वारस तपास मोहीम राबवणार
* मोबाईल तहसील कार्यक्रम ३ महिन्यात सुरू होणार