बतावणी करुन महिलेला लुबाडले

बतावणी करुन महिलेला लुबाडले

बतावणी करुन महिलेला लुबाडले
नवी मुंबई : बतावणी करून लुबाडणाऱ्या दोघा भामट्यांनी घणसोली भागात राहणाऱ्या एका ५४ वर्षीय महिलेचे दागिने लुबाडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. घणसोली गावात रानकर आळीत राहणाऱ्या गीता सणस (५५) शुक्रवारी (ता. २) घणसोली गावातील गावदेवी मंदिराजवळ राहणाऱ्या आईला भेटण्यासाठी जात होत्या. या वेळी वैभव बँकेजवळ आल्या असताना एका भामट्याने हातचलाखीने दागिने काढून घेत रिकामे पाकीट देऊन ठिकाणावरून पलायन केले. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
---
उन्हाच्या झळांमुळे रोपलागवड लांबणीवर
नवी मुंबई ः गेल्या वर्षी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लाखो झाडे लावणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने वृक्षारोपणाचे कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. जून महिन्याचे पाच दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप शहरात पाऊस न पडल्यामुळे महापालिकेने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांना ब्रेक दिला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे पावसाचे आगमन लांबणीवर गेले आहे. अशा परिस्थितीत लावलेली झाडे उन्हामुळे करपून जाऊ नयेत म्हणून महापालिका पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
----
तडीपार आरोपी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात
नवी मुंबई : मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला आरोपी तुर्भे स्टोअर्स भागात आढळून आला होता. अविनाश राठोड (२९) असे या आरोपीचे नाव असून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याला पुन्हा गजाआड केले आहे. तुर्भे स्टोअर्समधील के. के. आर. रोड भागात राहणाऱ्या आरोपी अविनाश राठोडवर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात मारामारी, चोरी, जबरी चोरी यासह इतर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अविनाश राठोड याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता.
---
धावत्या गाडीवर पडली लोखंडी सळई
ठाणे : ठाण्याच्या एल.बी.एस. रोड, तीन हात नाका येथील भारत पेट्रोल पंपाजवळील मेट्रोसाठीच्या पुलाचे काम चालू आहे. याच पुलावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातातून लोखंडी सळई एका चारचाकीवर पडल्याची घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तीन हात नाका परिसरात मेट्रोच्या पुलाचे काम चालू असताना पुलावर काम करणाऱ्या एका कामगाराच्या हातामधून लोखंडी सळई सुटून मुलुंड चेक नाक्याहून तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या जितेंद्र यादव यांच्या चारचाकीवर पडली. या चारचाकीमध्ये एकूण तीन प्रवासी प्रवास करत होते.
---
ठार मारण्याचा प्रयत्न करणारा गजाआड
ठाणे : काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा समझोता करण्यासाठी बोलावून आपल्या मित्रांसह जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी संगीत पाल या आरोपीला गजाआड केले आहे. फिर्यादी आदित्य प्रकाश इंदुलकर (वय २०) याच्या तक्रारीवरून श्रीनगर पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. फिर्यादी आदित्य प्रकाश इंदुलकर राहणार किसननगर, वागळे इस्टेट व आरोपी संजित अशोककुमार पाल (वय २४) यांच्यामध्ये २ जून रोजी भांडण झाले होते.
---
दिव्यात लवकरच आगरी कोळी वारकरी भवन
डोंबिवली: दिवा येथील बेतवडे गावात आगरी, कोळी आणि वारकरी भवन उभारले जाणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे या भवनासाठी नगरविकास विभागाने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या वास्तूचे भूमिपूजन बुधवारी (७ जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघर्ष समिती व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देण्यात आली. यावेळी विविध कामांचे लोकार्पणही करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com