
गुहागर-गुहागर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत
rat६p२१.jpg
०७४५३
गुहागरः कामाची पाहणी करताना माजी नगरसेवक समीर घाणेकर.
------------
गुहागर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत
कर्मचाऱ्यांचे युद्धपातळीवर काम; मुदतीनंतर नगरसेवक घाणेकरांची धडपड
गुहागर, ता. ६ः गुहागर शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभाग व स्वच्छता विभागाचे १९ कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून पाणीपुरवठा सुरळीत केला. दरम्यान, नगरसेवक म्हणून मुदत संपल्यानंतरही समीर घाणेकर यांनी नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपर्यंत पोचून कामाची पाहणी केली.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पाणी यावे यासाठी दिवसभर गुहागर नगरपंचायत प्रशासकीय कर्मचारी जनार्दन साटले, सुनील नवजेकर, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी केतन ठोंबरे, अशोक तांबे, रवींद्र जोशी, राजेंद्र पाटील, रियाज झोंबडकर, स्वच्छता विभागातील कर्मचारी मनोज घाडे, आशिष सांगळे, प्रतीक चव्हाण, नीलेश मोहिते, अभिजित मोरे, विजय घाणेकर, आशिष मोहिते, कांतिदीप सावंत, जगन्नाथ घोरपडे, राजेंद्र परकर, सूर्यकांत कदम, विकेश जाधव हे सर्वजण युद्धपातळीवर काम करत होते.
धरणातील पाण्याची पातळी लक्षात घेऊन त्या पातळीपासून विहिरीपर्यंत खोल चर काढण्याचे काम जेसीबीच्या साह्याने सोमवारी दुपारी सुरू करण्यात आले. सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास हे पूर्ण झाले. त्यानंतर पंप सुरू करून साठवण टाक्या भरून घेण्यात आल्या आणि पुन्हा पंप बंद करण्यात आले. मंगळवारी (ता. ६) सकाळी सहा वाजता पुन्हा पंप सुरू करण्यात आले. त्यामुळे सकाळपासून गुहागर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. रात्रीपासून विहिरीतील पाणी साठवण टाक्यांमध्ये सोडण्यात आले. त्यानंतर सकाळीही पंपाद्वारे पाणी टाक्यांमध्ये भरण्यात येऊन पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे जर्नादन साटले आणि सुनील नवजेकर यांनी सांगितले.
दरम्यान, गुहागर नगरपंचायतीमधील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ एप्रिलअखेर संपला; मात्र माजी नगरसेवक समीर घाणेकर सकाळपासूनच पाण्यासंदर्भातील माहिती घेत होते. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचीही त्यांनी चौकशी केली.