
टेरवच्या भवानीमातेचा रविवारी गोंधळ
ratchl६१.jpg
०७४४२
टेरव येथील भवानी माता.
-----------
टेरवच्या भवानीमातेचा रविवारी गोंधळ
चिपळूण, ता. ७ः तालुक्यातील टेरव येथील भवानीमातेचा मंगलमय गोंधळ सोहळा रूढी-परंपरेनुसार रविवारी (ता. ११) मृग नक्षत्रात उत्साहात होणार आहे. भवानी माता ही महाराष्ट्राची व कदम कुळांचे कुलदैवत आहे. ९६ कुळांपैकी ७२ कुळांची कुलस्वामिनी श्री भवानीमाता आहे. गोंधळ हा भवानीमातेचा मुख्य व महत्वाचा धार्मिक विधी आहे.
श्री क्षेत्र तुळजापूर येथे भवानीमातेच्या पूजेचा मान कदम कुळाचा असून, त्यांना भोपे असे संबोधले जाते. वैष्णवाच्यांत भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह साजरे होतात. देवस्थानचे पुजारी पुजेची मांडणी व घट स्थापित करतील त्यानंतर मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करण्यात येईल. गावातील कदम कुटुंबीय दिवट्या पाजळून घटाच्या भोवती पाच प्रदक्षिणा घालून ''भैरी-भवानीचा गोंधळ मांडीला, गोंधळाला यावे, उदो-उदो-उदो'' असा उद्घोष करतील. परंपरेनुसार हा गोंधळ, गोंधळी न घालता टेरव गावातील कदम घालतील. ग्रामस्थांच्या वतीने भवानीदेवीस गाऱ्हाणे घालून मंदिराच्या पूर्वेस आवाराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून देवीचे देणे-मागणे देण्यात येईल. विधीवत पूजाअर्चा झाल्यावर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी मंदिर स्वच्छ करून उद्यापनासह देवीला अभिषेक करण्यात येईल व अशाप्रकारे गोंधळ या धार्मिक विधीची सांगता होईल. गोंधळ या देवीच्या मुख्य व आवडत्या मंगल उत्सवात अगत्याने उपस्थित राहून भाविक, माहेरवाशिणी, सगेसोयरे, चाकरमानी यांनी सहपरिवार मित्रमंडळींसह उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.