
शिवरायांची दूरदृष्टी, नेतृत्व अनुकरणीय
07664
विजयदुर्ग : पार्थ मेस्त्री याचा सौरभ करडे यांच्या हस्ते यावेळी सत्कार झाला.
शिवरायांची दूरदृष्टी, नेतृत्व अनुकरणीय
सौरभ करडे ः किल्ले विजयदुर्गवर ‘शिवराज्याभिषेक’
देवगड, ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराज यांनी शत्रूंना नामोहरण करण्यासाठी मराठी आरमार सक्षम केले. शिवरायांकडे दूरदृष्टी होती. अशा या दृष्ट्या नेतृत्वाचे अनुकरण ही आज काळाची गरज आहे, असे मत शिवव्याख्याते सौरभ करडे यांनी किल्ले विजयदुर्ग येथे व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने येथील राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ, विजयदुर्ग ग्रामस्थ आणि किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी बलभीम मारुती मंदिरासमोर शिवव्याख्याते करडे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी करडे यांनी शिवरायांची तत्कालीन युद्धनीती, रयतेवरील प्रेम, दृष्टीकोन आदींबाबत विस्तृत उहापोह केला. यावेळी मंचावर विजयदुर्ग प्रभारी सरपंच रियाज काझी, विद्याधर माळगावकर, आजाकाका धुळप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रणजित हिर्लेकर यांनी कवी भूषण यांचे छत्रपतींच्या जीवनावरील छंद सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र परुळेकर यांनी केले. सूत्रसंचालन बापट यांनी केले.
दरम्यान, राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी मारुती मंदिरामध्ये शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून नित्य पूजापाठ करण्यात येणार आहे. हा उपक्रम विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये गावातील ग्रामस्थ वर्षभर राबविणार आहेत. यानिमित्ताने मालवण येथील शालेय विद्यार्थी पार्थ साईनाथ मेस्त्री याने शिवाजी महाराज यांची रांगोळी रेखाटली होती. किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने सौरभ करडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार केला. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, उपाध्यक्ष शरद डोंगरे, सहसचिव यशपाल जैतापकर उपस्थित होते. करडे यांनी पार्थची कला बघून त्याला संत ज्ञानेश्वरांची मूर्ती भेट दिली. रांगोळी, मारुती मंदिराजवळ प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली.