
वैभववाडी शहरात भीषण पाणीटंचाई
वैभववाडी शहरात भीषण पाणीटंचाई
नागरिक त्रस्त; घागर मोर्चा काढण्याच्या तयारीत
वैभववाडी, ता. ६ ः शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून संतप्त नागरिक नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.
वाभवे-वैभववाडी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. काही भागात दोन तीन दिवसाने तर काही भागात चार पाच दिवसाने पाणी येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील काही नागरिक सध्या ३०० लिटर पाण्यासाठी १५० ते २०० रूपये मोजत आहेत. काही महिला दीड दोन किलोमीटरवर असलेल्या विहीरीवरून पाणी आणत आहेत. यासंदर्भात ठाकरे गटाचे शहरप्रमुख शिवाजी राणे यांनी आज वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शहरात गेल्यावर्षी २५ लाख रूपये खर्चून नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. तरी देखील शहरात पिण्याचे पाणी मिळत नाही. गेले चार दिवस तर काही भागात चिखलगाळ युक्त पाणीपुरवठा झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
---------
कोट
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील सत्ताधारी मंजूर कामांचा मक्ता कुणाला मिळतो, यात गुंतलेले आहेत. परंतु, पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष आहे. अशीच स्थिती राहीली तर जनतेचा उद्रेक होईल. त्याला सर्वस्वी नगरपंचायत प्रशासन जबाबदार असेल.
- रणजित तावडे, नगरसेवक, वाभवे वैभववाडी
---------
कोट
शहरातील पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी खर्चले आहेत; परंतु, अजूनही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नगरपंचायतीनंतर ही समस्या सुटेल, अशी अपेक्षा होती; परंतु, आतागी शहरात पाणीटंचाई आहे. त्यामुळे नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढणार आहोत.
- अक्षता जैतापकर, नगरसेविका, वाभवे वैभववाडी
---------
कोट
शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या एका विहिरीचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलस्वराज्यंतर्गत बांधलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा सुरू आहे; परंतु, त्या विहिरीतही साठा होण्यास वेळ लागत असल्याने पाणीपुरवठा दिवसाआड होत आहे.
- एस. व्ही. पवार, पाणीपुरवठा अधिकारी, वाभवे वैभववाडी नगरपंचायत