
‘वंदे भारत’ला सावंतवाडीत थांबा द्या
07846
सावंतवाडी ः येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन देताना तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, मयूर चराटकर, राजू तावडे, नरेंद्र देशपांडे, प्रवीण मांजरेकर आदी.
‘वंदे भारत’ला सावंतवाडीत थांबा द्या
सावंतवाडी पत्रकार संघ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन
सावंतवाडी, ता. ७ ः येथील रेल्वे टर्मिनसचे अपूर्ण काम पूर्ण करुन ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला सावंतवाडी थांबा द्या, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्या, अशी मागणी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ निवेदनाद्वारे करण्यात आली.
येथील पालिकेच्या संत गाडगेबाबा महाराज भाजी मंडईच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे येथे आले असता त्यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराटकर, सहसचिव विनायक गांवस, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, कार्यकारणी सदस्य राजू तावडे, नरेंद्र देशपांडे, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, विजय देसाई, मोहन जाधव, जतिन भिसे, अनिल भिसे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी हा सिंधुदुर्गातील एक विकसनशील व पर्यटनदृष्ट्या महत्वाचा तालुका असून महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणारा दुवा आहे; मात्र, येथे रेल्वे टर्मिनसला मंजुरी मिळूनही त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. शिवाय ‘वंदे भारत एक्स्प्रेस’लाही कणकवली वगळता जिल्ह्यात अन्यत्र कोठेही थांबा दिला नाही. सावंतवाडीतही थांबा मिळावा व या मागणीची पूर्तता करण्यासाठी आपण केंद्राकडे शिफारस करावी, अशी मागणी करण्यात आली.
---
इतरही काही मागण्या
केंद्राने राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला मंजुरी देऊन कोकणवासीयांची कित्येक वर्षाची मागणी पूर्ण केली आहे. या महामार्गाला मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक तथा सिंधुदुर्ग सुपुत्र (कै.) बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देऊन त्यांचे नाव अजरामर करावे तसेच दहा वर्षे उलटूनही सिंधुदुर्ग वगळता रायगड व रत्नागिरी या भागात कामे अपूर्ण असल्याने महामार्ग पूर्णत्वास आला नाही. त्यामुळे कोकणवासीयांनी मुंबईमध्ये ये-जा करण्यासाठी पुणे-बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करावा लागतो. मुंबई-गोवा या महामार्गाचे प्रलंबित काम त्वरित पूर्ण करावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.