बाजार समितीचा परवाना बंधनकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समितीचा परवाना बंधनकारक
बाजार समितीचा परवाना बंधनकारक

बाजार समितीचा परवाना बंधनकारक

sakal_logo
By

बाजार समितीचा परवाना बंधनकारक
तुळशीदास रावराणे ः व्यापाऱ्यांनी बाजार शुल्क भरण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ७ ः जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या नियमित विविध पिकांची खरेदी-विक्री प्रक्रिया करीत असलेल्या सर्व खरेदीदारांनी (व्यापाऱ्यांनी) बाजार समितीचा रीतसर परवाना घ्यावा. नियमानुसार बाजार व देखरेख शुल्क सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीकडे भरणा करावी, असे आवाहन सभापती तुळशीदास रावराणे यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्गने नियमन केलेल्या आंबा, काजू-बी, सुपारी, भात (सडीक/बिनसडीक) मासळी व इतर जलचर प्राणी, गहू, केळी, कलिंगड, पालेभाज्या व भाज्या, पशुपक्ष्यांपासून मिळणारे उत्पन्न, अंडी, कोंबड्या, गुरेढोरे, मेंढ्या व बकरी, वन उपजत बांबू व जळावू लाकूड, इमारती व खैराचे लाकूड, इतर फुले, गळीत धान्य भुईमूग (फोडलेला व न फोडलेला), नारळ, विड्याची पाने, कडधान्य हरभरा, उडीद, मूग, वाल, चवळी, वाटाणे, तेल व तूप आदी शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवसाय करीत असलेल्या जिल्हा कार्यक्षेत्रातील व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) नियम १९६७ चे कलम ६ (१) अन्वये आवश्यक असलेला बाजार समितीचा रितसर परवाना घेऊन खरेदीदारांनी आपल्या खरेदी किमतीवर शेकडा एक रुपया बाजार शुल्क व खरेदी किंमतीवर शेकडा पाच पैसे देखरेख शुल्क बाजार समितीकडे भरणा करणे कायदयाने बंधनकारक आहे. जिल्ह्यात खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्यास बाजार समितीच्या परवान्या संबंधीची आवश्यक ती पूर्तता त्वरित समितीकडे ओरोस येथील मुख्य कार्यालयात येऊन करावी, अन्यथा कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली असून नवनिर्वाचित संचालक मंडळ कार्यरत झाले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाकरिता बाजारपेठ व व्यापाऱ्यांना सुविधा पुरविण्याकरिता बाजार आवार उभारणीकरिता समिती प्रयत्नशील आहे. ५ जूनच्या सभेतील ठरावाप्रमाणे जिल्हा कार्यक्षेत्रातील वरील नियमित पिकांची खरेदी-विक्री प्रक्रिया करीत असलेल्या सर्व खरेदीदारांनी (व्यापाऱ्यांनी) बाजार समितीचा रितसर परवाना घेऊन नियमानुसार बाजार शुल्क व देखरेख शुल्क भरणा करून समितीस सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.