भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये १३ पासून शैक्षणिक कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये
१३ पासून शैक्षणिक कार्यशाळा
भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये १३ पासून शैक्षणिक कार्यशाळा

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये १३ पासून शैक्षणिक कार्यशाळा

sakal_logo
By

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये
१३ पासून शैक्षणिक कार्यशाळा

अच्युत सावंत भोसले; नव्या शैक्षणिक धोरणाबाबत मार्गदर्शन

सावंतवाडी, ता. ७ ः शैक्षणिक वर्ष २०२३ पासून देशातील सर्व शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या धोरणाची संपूर्ण माहिती व शिक्षण पद्धतीमधील बदल शिक्षकांना समजावेत यासाठी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने १३ व १४ ला शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन केले आहे. अशा प्रकारची कार्यशाळा ही जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आयोजित केली जात आहे, असा माहिती शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी दिली.
गोवा येथील शिक्षणतज्ञ सबीना रॉय या या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. रॉय यांनी देशातील अनेक शाळांमध्ये या विषयावर मार्गदर्शन केलेले असून शालेय व पूर्व शालेय स्तरावरील येऊ घातलेल्या बदलांचा त्यांना चांगला अभ्यास आहे. सद्यस्थितीत १०+२+३ या शैक्षणिक प्रणालीनुसार शाळांचे कामकाज चालते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षणासाठी ५+३+३+४ या रचनेवर आधारित अध्यापन पद्धती विकसित करण्यात आलेली आहे. यानुसार सुधारित शिक्षण प्रणाली ही ३-८ वयोगटासाठी पायाभूत स्तर ५ वर्षे, ८-११ वयोगटासाठी पूर्व अध्ययन स्तर ३ वर्षे, ११-१४ वयोगटासाठी पूर्व माध्यमिक स्तर ३ वर्षे व १४-१८ वयोगटासाठी माध्यमिक स्तर ४ वर्षे अशी असेल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता प्रभावी शैक्षणिक वातावरण तयार करणे, नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून राष्ट्रीय अभ्यासक्रमाचे नियोजन करणे, त्यांचा वैयक्तिक, सामाजिक व भावनिक विकास साधण्याकरिता मार्गदर्शन करणे व विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन, बहुउद्देशीय ३६० अंशातील सर्वांगीण विकासावर भर हे या कार्यशाळेतील प्रशिक्षणाचे प्रमुख मुद्दे असतील. जिल्ह्यात अशा प्रकारचे प्रशिक्षण पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असून येथील शिक्षकांसाठी ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी व्यक्त केला आहे. यामुळे नवीन शिक्षण पद्धतीशी जुळवून घेणे व स्वतःला अद्ययावत बनविणे येथील शिक्षकांना शक्य होणार आहे. तरी या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांनी व शिक्षकांनी आपली नावे १० जूनपर्यंत नोंदवावीत, असे आवाहन शाळेतर्फे केले आहे.