कृष्णकांतचे ''आयपीएस''चे स्वप्न पूर्ण करू

कृष्णकांतचे ''आयपीएस''चे स्वप्न पूर्ण करू

swt81.jpg
08113
विवेकानंद नाईक

कृष्णकांतचे ‘आयपीएस’चे स्वप्न पूर्ण करू
विवेकानंद नाईकः दरवर्षी तालुक्यात दोन विद्यार्थ्यांची जबाबदारी
सकाळ वृत्तसेवा 
दोडामार्ग, ता. ८ : बारावीच्या परीक्षेत तालुक्यातून प्रथम आलेल्या कृष्णकांत गवस याला आयपीएस बनायचे आहे; मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तो आपले स्वप्न पूर्ण करू शकत नसल्याने त्याच्या या आयपीएसपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत त्याला दत्तक घेतल्याचे येथील उद्योजक विवेकानंद नाईक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. याबरोबरच दरवर्षी दोडामार्ग तालुक्यातून अशा दोन विद्यार्थ्यांची जबाबदारी उचलणार असून तालुक्यातून आयएएस आणि आयपीएस अधिकारी घडविण्याचा आणि त्यांच्याकडून देशसेवा करून घेण्याचा प्रेरणादायी संकल्प हाती घेतल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. 
नाईक म्हणाले, ‘‘दोडामार्ग तालुक्यात कुशल बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी आहेत. अफाट बौद्धिक क्षमता त्यांच्याजवळ आहे. याची प्रचिती मला कृष्णकांत गवस याच्याशी संवाद साधताना आली. बारावीच्या परीक्षेत त्याने उज्ज्वल यश संपादन केल्याचे वृत्त समजले. त्यानंतर त्याला व त्याच्या आईला घरी बोलावून त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. कृष्णकांतच्या वडिलांना कोरोना काळात देवाज्ञा झाली. त्यानंतर घराची जबाबदारी त्याच्यावर आली. आई आणि कृष्णकांत दोघेही आपला प्रपंच काटकसरीने चालवत आहेत. बालवयातच घराची जबाबदारी खांद्यावर पडली, तरीही तो डगमगला नाही. घरातील प्रपंच करताना उच्च शिक्षण घेण्याची जिद्द त्याने सोडली नाही. शिक्षण घेत असताना घरातील व शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी तो काम देखील करायचा. त्याची ती जिद्द, मेहनत वाखाणण्याजोगी आहे. त्याच्याशी बराच संवाद साधला. त्याला काय बनायचे आहे, त्याची मनस्थिती काय आहे, तो दृढनिश्चयी आहे का, याची साधारण माहिती करून घेतली. त्याला काही प्रश्न विचारले असता त्यांची त्याने समाधानकारक उत्तरे दिली. त्याच्या बोलण्यातून त्याचा प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास जाणवत होता. त्याचे आदरपूर्वक बोलणे, समजून उमजून उत्तरे देण्याची पद्धत यातून कुशाग्र बुद्धिमत्ता दिसून आली. त्यामुळे कृष्णकांतचे आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पुढाकार घेत आहे. आयपीएस पूर्ण करण्यापर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. त्याचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्याला दोडामार्ग तालुक्यातून पहिला आयपीएस अधिकारी बनविण्यासाठी सर्व प्रयत्न करू आणि निश्चितच या प्रयत्नांना यश येईल."

चौकट
...तीच माझी गुरुदक्षिणा
आयपीएस अधिकारी झाल्यावर गुरुदक्षिणा म्हणून मला काय देशील, असा प्रश्न उद्योजक नाईक यांनी कृष्णकांत याला विचारल्याने तो काहीसा भांबावला; मात्र मला काही नको, फक्त तीन विद्यार्थ्यांना आयपीएस बनविण्याची जबाबदारी तू घे, असे नाईक यांनी सांगत पुन्हा एकदा आपल्या मनाच्या मोठेपणाचे दर्शन घडविले.

चौकट 
यशस्वी विद्यार्थ्यांचा २७ जूनला गुणगौरव
दहावी, बारावी परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उद्योजक नाईक यांच्यावतीने करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व शाळांमधील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा हा सत्कार सोहळा तालुका वर्धापन दिनाचे औचित्य साधून २७ जूनला करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा सत्कार सोहळा दोडामार्ग पत्रकार समिती व विवेकानंद नाईक ट्रस्टमार्फत संयुक्तरित्या करण्यात येणार आहे. यावेळी दोडामार्ग पत्रकार समितीच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com