दाभोलीवासीयांचा उपोषणाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोलीवासीयांचा उपोषणाचा इशारा
दाभोलीवासीयांचा उपोषणाचा इशारा

दाभोलीवासीयांचा उपोषणाचा इशारा

sakal_logo
By

दाभोलीवासीयांचा
उपोषणाचा इशारा
वेंगुर्लेः दाभोली ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशनअंतर्गत नळ जोडणीला पाणीच येत नसून या संदर्भात वारंवार तक्रार करूनही दखल घेण्यात येत नसल्याने येत्या पाच दिवसांत नळपाणी पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा येथील ग्रामस्थांनी वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. दाभोली येथील ग्रामस्थ रामचंद्र शिरोडकर, लवू शिरोडकर, फटू शिरोडकर, राजश्री शिरोडकर, महादेव शिरोडकर, चंद्रकांत शिरोडकर, मधू माडये, प्रथमेश शिरोडकर, चंद्रमागा शिरोडकर, विषया गावडे, उर्मिला गावडे, विश्वास गावडे, जानकी आचरेकर, वीरेंद्र शिरोडकर आदी ग्रामस्थांनी दाभोली वेंगुर्ले पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी संदीप मांजरेकर यांना निवेदन देऊन चर्चा केली. येत्या पाच दिवसांत नळपाणी पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास दाभोली ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला.
................
कुडाळात २३ पासून
जिल्हा भजन स्पर्धा
कुडाळः येथील श्री देव मारुती नगर ब्राह्मण मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्त २३ ते २९ जून या कालावधीत खुली जिल्हास्तरीय भजन स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी ११ हजार १११ रुपये, ७ हजार ७७७ रुपये, ५ हजार ५५५ रुपये, ३ हजार ३३३, २ हजार २२२, उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय १,५०१ रुपये अशी पारितोषिके आहेत. विजेत्यांना चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट हार्मोनियम वादक, पखवाज वादक, गायक व तालरक्षक यांना प्रत्येकी १००१ रुपये व चषक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सुमेध साळवी यांच्याशी संपर्क साधावा.
..............
वाळू उत्खननाबाबत
देवलीवासीयांचे निवेदन
मालवणः प्रशासन व बंदर विभागाची अनधिकृत वाळू व्यवसायाला साथ असल्याने बेकायदा चालणाऱ्या वाळू व्यवसायाला आळा बसणे कठीण झाले आहे, असा आरोप देवली खाडीपात्रालगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे त्यांनी तक्रार केली आहे. देवली खाडीपात्रात पुलानजीक वाळू उत्खनन होते. याबाबत बंदर विभागाचे लक्ष वेधले, तरीही ठोस कारवाई होत नाही. पकडण्यात आलेल्या होडीवरही अद्याप कारवाई केलेली नाही. अधिकारी तेथे येऊन वाळू माफियांच्या भेटी घेतात, असाही आरोप ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
.................
ओबीसी समाजाच्या
जनगणनेची मागणी
ओरोसः ओबीसी समाजाची २०२१ मध्ये होऊ घातलेली जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने राज्यात जनगणना करून ओबीसी समाजास न्याय मिळवून यावा, अशी मागणी ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री व उपाध्यक्ष रमण वायंगणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री शिंदे वेगुर्ले दौऱ्यावर आले असता जिल्हाध्यक्ष मेस्त्री, उपाध्यक्ष वायंगणकर आदींसह सुनील डुबळे, चंद्रकांत कुंभार यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र्य वसतिगृह सुरू करावे, जिल्हयातील कारागीर, महिला बचतगटांना ओबीसी महामंडळाकडून आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्ह्याच्या नियोजन कमिटीत अनुदानाची तरतूद करावी, ओबीसीची जातीनिहाय गणना व्हावी, आदी मागण्या करण्यात आल्या.
..............
कांबळे गल्लीसाठी
टॅंकरने पाणीपुरवठा
कणकवलीः कांबळे गल्ली येथील नागरिकांना पाण्याबाबत दिलासा मिळावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते वैभव मालंडकर यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधत माहिती दिली. मालंडकर यांनी माजी नगरसेवक कन्हैया पारकर यांना याबाबतची माहिती देत कावळे गल्ली येथील नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला. नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले. शहरात पाणीटंचाईची झळ आता प्रत्येक प्रभागात वाटू लागली आहे. पाणीटंचाईने पुरते हैराण झालेले नागरिक आता आपल्या लोकप्रतिनिधींकडे पाणीपुरवठ्याची मागणी करताना दिसत आहेत. मालंडकर यांनी तात्पुरत्या स्वरुपात का होईना, टँकरने पाणीपुरवठा केल्याने दिलासा मिळाल्याबद्दल कांबळेगल्ली येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले. यावेळी कांबळ गल्ली येथील वैभवी पाटकर आणि नागरिक उपस्थित होते.
..............
अपघातातील मृतांना
वेंगुर्ले येथे श्रद्धांजली
वेंगुर्लेः ओरिसा-बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस व मालगाडी यांची धडक होऊन झालेल्या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला आणि एक हजारपेक्षा जास्त लोक जखमी झाले. या रेल्वे अपघातात जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने वेंगुर्ले येथे मेणबत्त्या पेटवून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, वेंगुर्ले तालुका काँग्रेस अध्यक्ष विधाता सावंत, शहराध्यक्ष प्रकाश डिचोलकर, माजी नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे, संकेत वेंगुर्लेकर, स्वदीप परब, साईश परब आदी उपस्थित होते.
..............