
निधन
०८०९४
जयवंती चव्हाण यांचे निधन
चिपळूण ः तालुक्यातील मार्गताम्हाणे खुर्द उगवतवाडी येथील जयवंती चव्हाण (वय १०६) यांचे बुधवारी निधन झाले. हरिश्चंद्र जयराम चव्हाण यांच्या त्या आई होत. एवढ्या वयातही अंथरूणाला न खिळता अखेरच्या श्वासापर्यंत कुटुंबीयांमध्ये मिसळून व मृत्यूची पुसटशी कल्पनाही नसलेल्या आजींचे अचानक जाणे सर्वांसाठी अचंबित करणारे ठरले आहे. कित्येक वर्षे आपल्या गावातील घरामध्येच रमणाऱ्या जयवंती चव्हाण या आपल्या घराण्यात मोठ्या आई म्हणून ओळखल्या जायच्या. सर्वचजण त्यांना मोठ्या आई म्हणून हाक मारत. अनेक पावसाळे पाहिलेल्या या आजी अनेकांना जीवन जगण्याची स्फूर्ती देणाऱ्या होत्या. पूर्वीच्या काळी कष्टाची केलेली कामे, लवकर उठणे, आहाराच्या पद्धती जोपासत आजींनी आपल्या जीवनाची काढलेली १०६ वर्षे आजच्या भावी पिढीला आश्चर्यकारक ठरली आहेत. पिढ्यानपिढ्यांची साक्षीदार असलेल्या या आजीचा त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या वर्षी मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला होता. त्यांचे प्रदीर्घ जगणे हाच आदर्श त्यांच्या निधनातून समोर आला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
०८१११
नरहर चक्रदेव यांचे निधन
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील शेतकरी, नारळ, सुपारीचे बागायतदार नरहर नारायण तथा बाळकाका चक्रदेव (वय ८५) यांचे निधन झाले. काल (ता. ७) संध्याकाळी गणेशगुळे अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार सुकांत चक्रदेव तसेच नाट्य कलाकार हेमंत आणि मिलिंद चक्रदेव यांचे ते वडील. बाळ काका यांनी १९७३च्या दरम्यान नारळ, सुपारी रोपवाटिका सुरू केली. तेव्हा प्रतिकूल स्थितीत रोपवाटिका सुरू करून अनेकांना रोजगार दिला. तरुणांना या व्यवसायात येण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी कोकम, तळलेले गरे, आंबा पोळी अशी कोकण प्रॉडक्ट सुरू करून नाव मिळवले. मनमिळावू आणि मेहनती व्यक्तिमत्व म्हणून त्यांची परिसरात ख्याती होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.