गुहागर - तालुक्यात 4 गावात 5 वाड्यांना टँकर

गुहागर - तालुक्यात 4 गावात 5 वाड्यांना टँकर

rat८p२५.jpg KOP२३M०८१५५ -धोपावे ः येथे टँकरचे पाणी घेण्यासाठी महिलांनी केलेली गर्दी.

गुहागर तालुक्यात ४ गावात ५ वाड्यांना टँकर
धोपावेत नासीम मालाणीचे साह्य ; नवानगर दुर्गम
गुहागर, ता. ८ ः वाढलेल्या तापमानामुळे तालुक्यात पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या वाढत आहे. शासनाद्वारे ४ गावातील ५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. आरजीपीपीएलद्वारे तीन ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा सुरू आहे. काताळे ग्रामपंचायतीमधील नवानगर येथे टँकरच पोचू शकत नसल्याने गावकऱ्यांना पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. धोपावेत नासीम मालाणीच्या अर्थसाह्यातून २ टँकर येत असून, साखरी त्रिशुळचे सरपंच स्वत:च्या बोरवेलवरून १ वाडीला पाणीपुरवठा करत आहेत.
गुहागर तालुक्यातील मळण गवळवाडी (२५ लोकसंख्या) येथे ३० मे पासून दर चार दिवसांनी टँकर सुरू आहे. सडेजांभारी खुर्द येथील ५८४ लोकसंख्येला पाणीटंचाई जाणवत असून, तेथे २० मे पासून दर दोन दिवसांनी एक टँकर पाठवला जातो. साखरीत्रिशुळ गवळवाडीतील १३२ लोकसंख्येसाठी पंचायत समितीतर्फे चार दिवसांतून एकदा टँकर पाठवला जात आहे. पाऊस लांबल्याने येथील सुतारवाडी व आजपर्यंत कधीही पाणीटंचाई जाणवली नव्हती. अशा साखरी त्रिशुळ मोहल्ला येथेही प्रथमच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सुतारवाडीतील ग्रामस्थांसाठी अजूनही पाण्याची व्यवस्था झालेली नाही. मोहल्ल्यातील ग्रामस्थांना सरपंच सचिन म्हसकर यांनी स्वत:च्या बोरवेलवरून दीड कि.मी. पाईप टाकून पाणी दिले आहे.
धोपावे ग्रामपंचायतीमधील जवळपास सर्वच वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या धोपावे तरीबंदर येथील ६८८ व खारवीवाडीतील ८८५ लोकसंख्येसाठी १५ मे पासून दोन दिवसांनी पंचायत समितीकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय पाणी कमिटीने असलेल्या पाण्याचे नियोजन करून पूर्व विभागातील तीन प्रभागांना दोन दिवसाआड १ प्रभाग या पद्धतीने गोठणीवरील पाण्याचा पुरवठा केला आहे तर पश्चिम विभागाला कुळेवाडी येथील जॅकवेलवरून तीन दिवसांनी पाणी पुरवले जात आहे.

चौकट
देणगी गोळा करून पाणीपुरवठा
खारवीवाडीतील ग्रामस्थांची संख्या मोठी असल्याने दरवर्षीप्रमाणे देणगी गोळा करून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय येथील तरुण कार्यकर्त्यांनी घेतला होता. याच कार्यकर्त्यांमधील आशीर्वाद पावसकर हे सरपंच आहेत. त्यामुळे त्यांनी पाणी कमिटीसह पुढाकार घेत देणगीदार शोधण्यास सुरवात केली. या वेळी मालाणी ग्रुपचे नासीमशेठ मालाणी यांनी आवश्यक तितके दिवस टँकरने पाणीपुरवठा करण्यास आर्थिक मदत देण्याचे कबूल केले. त्यामुळे नासीमशेठ यांच्या आर्थिक सहकार्यातून धोपावे येथे सकाळी १ व सायंकाळी १ असे दोन टँकर सुरू करण्यात आले आहेत.

चौकट
दोन गावांत जानेवारीपासूनच पाणीटंचाई
वेलदूर व रानवी या दोन गावांत जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली. सुरवातीला या दोन्ही ग्रामपंचायतींनी ग्रामनिधीतून आपल्या गावातील वाड्यांना एक दिवस आड टँकरने पाणीपुरवठा केला. फेब्रुवारीअखेर अंजनवेल गावातील कातळवाडी व सुतारवाडीला टंचाई जाणवू लागली. १९ एप्रिलपासून आरजीपीपीएलने या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com