
दहा वर्षांत 1385 रुग्णांना मदतीचा हात
दहा वर्षांत १३८५ रुग्णांना मदतीचा हात
जिल्हा परिषदः प्राथमिक उपचारासाठी आर्थिक मदत
नंदकुमार आयरेः सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ः जिल्ह्यातील दुर्धर आजारी रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी आर्थिक सहाय्य करणारी योजना राबवून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या १० वर्षांत जिल्ह्यातील दुर्धर आजारी असलेल्या १३८५ रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. त्यांना आतापर्यंत २ कोटी २१ हजार २५५ रुपये आर्थिक मदत दिली आहे. त्यामुळे ही योजना गोरगरीब लाभार्थींसाठी आधार ठरली आहे.
जिल्ह्यातील दुर्धर आजारी रुग्णांना प्राथमिक औषधोपचारासाठी मदतीचा हात देता यावा, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने स्वनिधीतून आर्थिक साहाय्य योजना २०१३ मध्ये कार्यान्वित केली. या योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अनेक लाभार्थींनी घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दुर्धर आजारी रुग्णांना अर्थसहाय्य देणे योजनेचा लाभ गेल्या १० वर्षांत जिल्ह्यातील १३८५ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी आतापर्यंत २ कोटी २१ हजार २५५ रुपये निधी खर्च केला आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील कर्करोग, हृदयरोग, किडनी रोग यासारख्या दुर्धर आजारी रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत देण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ २०१३-१४ मध्ये ९९ लाभार्थींना १४ लाख ११ हजार ३५१ रुपये, २०१४-१५ मध्ये १८५ लाभार्थींना २५ लाख ८१ हजार ३३४ रुपये, २०१५-१६ मध्ये ११९ लाभार्थींना १६ लाख ९५ हजार ८२५ रुपये, २०१६-१७ मध्ये १०५ लाभार्थींना १४ लाख ९४ हजार ४६७ रुपये, २०१७-१८ मध्ये १०४ लाभार्थींना १५ लाख ३५ रुपये, २०१८-१९ मध्ये १३९ लाभार्थींना २० लाख ३ हजार ४२४ रुपये, २०१९-२० मध्ये १७२ लाभार्थींना २४ लाख ९८ हजार ६२२ रुपये, २०२०-२१ मध्ये १७० लाभार्थींना २४ लाख ९७ हजार ३९९ रुपये, २०२१-२२ या वर्षात जिल्ह्यातील १२५ लाभार्थ्यांना १८ लाख ४३ हजार ७९५ रुपये, तर २०२२-२३ मध्ये १६७ लाभार्थींना २४ लाख ९५ हजार ००३ रुपये एवढे आर्थिक सहाय्य दिले आहे. अशा प्रकारे योजना कार्यान्वित झाल्यापासून गेल्या १० वर्षांत एकूण १३८५ दुर्धर आजारी रुग्णांना २ कोटी २१ हजार २५५ रुपये अनुदान आर्थिक मदत म्हणून वितरित करण्यात आले आहे. या योजनेतील प्रत्येक दुर्धर आजारी लाभार्थ्याला १५ हजारपर्यंत लाभ देण्याची मर्यादा असून या योजनेसाठी दरवर्षी २० ते २५ लाखाची तरतूद जिल्हा परिषद स्व निधीतून करण्यात येते. २०२२-२३ मध्ये एकूण १७० प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी १६७ पात्र लाभार्थींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून या लाभार्थ्याना आर्थिक मदतीचा लाभ देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेची ही नावीन्यपूर्ण योजना दुर्धर आजारी रुग्णांसाठी आधार ठरली आहे.
कोट
कर्करोग, हृदयरोग, किडणीरोग यांसारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या जिल्ह्यातील रुग्णांना प्राथमिक औषधोपचारासाठी आर्थिक साहाय्य करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील दुर्धर आजारी रुग्णांनी लाभ घ्यावा.
- डॉ. महेश खलिपे, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी