रत्नागिरीत रंगणार पहिले प्रगतिशील साहित्य संमेलन

रत्नागिरीत रंगणार पहिले प्रगतिशील साहित्य संमेलन

प्रगतिशील साहित्य संमेलन होणार रत्नागिरीत
१ ते ३ डिसेंबर कालावधीत आयोजन; अध्यक्षपदी डॉ. भालचंद्र मुणगेकर
रत्नागिरी, ता. ६ः गतिशील लेखक संघ, महाराष्ट्र आणि रत्नागिरीतील एस. पी. हेगशेट्ये कॉलेजतर्फे पहिले प्रगतिशील साहित्य संमेलन १ ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. प्रगतिशील लेखक संघ ही गेल्या ९० वर्षांपासून कार्यरत असणारी सांस्कृतिक आणि वाङ्मयीन क्षेत्रात काम करणारी राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे.
संस्थेचा २९ राज्यांमध्ये तिचा विस्तार असून, महाराष्ट्र त्यापैकी एक होय. प्रागतिक विचारधारा आपल्या साहित्यकृती, कलाकृती आणि विविध सर्जनाच्या, सृजनाच्या प्रकारांमध्ये प्रागतिकता हे मूल्य मध्यवर्ती ठेवत भविष्यवेधी भान जागृत करत आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. भालचंद्र मुणगेकर तर संमेलनाचे उद्घाटक आहेत सुप्रसिद्ध हिंदी कवी, कथाकार कुमार अम्बुज (भोपाळ, मध्यप्रदेश) आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष अभिजित हेगशेट्ये हे आहेत. या संमेलनामध्ये उद्घाटन सत्र, दोन कवी संमेलने, मराठी समिक्षेची सद्यःस्थिती, राजकारणातली नैतिकता, कॉम्रेड शरद पाटील समजून घेताना, मुस्लिमांचे बहिष्करण आणि भारतीय लोकशाही, कोकणचे पर्यावरणः साहित्य आणि संघर्ष या पाच विषयांवर परिसंवाद होणार आहेत.
मराठी समूह आणि मराठी भाषा हे सदैव विकसनशील, प्रयोगशील आणि प्रगत अशा समाजसुधारणेच्या पक्षात राहिलेली आहे; मात्र ही प्रागतिकता अधोरेखित करण्याचे जाणीवपूर्वक कार्यक्रम विकसित करता आले नाहीत, ती उणीव भरून काढण्याचा हा एक उपक्रम आहे. सामान्य माणसांना भेडसावणारे पर्यावरणाचे प्रश्न, जैवविविधतेच्या अस्तित्वाचा प्रश्न, किमान मूलभूत सुविधांचा अभाव या साऱ्यांचा वाङ्मय मुल्यांवर आणि साहित्य व्यवहारावर कसा परिणाम होतो याबाबत विचारमंथन केले जाणार आहे.

चौकट
लोकांना भूमिका घेण्यास भाग पडणार
समाजात जागोजाग विखुरलेल्या प्रगतशील लेखक, कवी, कलावंत, चित्रकार, पत्रकार, छायाचित्रकार, ब्लॉगर्स, नाट्यकर्मी, साहित्यिक, कार्यकर्ते, प्रकाशक विक्रेते यांची एक प्रोग्रेसिव्ह आयडेंटिटी स्पष्ट करणे, ठळक करणे, पृष्ठभागावर आणणे, निरपेक्ष, अपक्ष, तटस्थ, आशा वृत्तीने सृजनशील काम करणाऱ्या लोकांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक भूमिका घेण्यास भाग पाडणे, ही प्रगतिशील साहित्य संमेलनाची उद्दिष्टे आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com