भजनी मंडळांसाठीची योजना ठरली ''सुपरहिट''

भजनी मंडळांसाठीची योजना ठरली ''सुपरहिट''

swt७१५.jpg
M२८८५९
सिंधुदुर्गनगरीः भजनी साहित्य वाटप मंडळ निवड सोडत पद्धतीने करताना लहान मुलगा. सोबत प्रशासक प्रजित नायर, आयएएस विशाल खत्री, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, उपमुख्य लेखाधिकारी बाळासाहेब पाटील.

भजनी मंडळांसाठीची योजना ठरली ‘सुपरहिट’
जिल्हा परिषदेतर्फे उपक्रम; ड्रॉ काढत २५० मंडळांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ७ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच स्वनिधितून राबविलेली एखादी योजना सुपरहिट झाली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या बजेटमधून जिल्ह्यातील भजनी मंडळांना साहित्य देण्यासाठी राबविलेल्या योजनेच्या लाभासाठी रेकॉर्डब्रेक ३ हजार २२२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आज प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ काढत यातील २५० भजन मंडळाना याचा लाभ मंजूर करण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकृत फेसबुकपेज वरून लाईव्ह प्रक्षेपण करीत ही सोडत काढण्यात आली.
ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्रशासक नायर यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील भजनी मंडळांना वाद्य साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पहिल्याच वर्षी २५ लाख रुपये एवढी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. ही योजना एवढी लोकप्रिय झाली की जिल्ह्यातील तब्बल ३ हजार २२२ भजनी मंडळांनी यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर केले. त्यामुळे जिल्हा परिषदेला लाभार्थी निवड करण्यासाठी लकी ड्रॉ पद्धत अवलंबावी लागली. आज प्रत्यक्षात यासाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रशासक नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. यावेळी आयएएस विशाल खत्री, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, उपमुख्य लेखाधिकारी बाळासाहेब पाटील, अधीक्षक विठ्ठल मालंडकर, विस्तार अधिकारी एम. वाय. शिंगाडे, दत्ता गायकवाड, सुधीर बालम, श्रीमती कविता मेस्त्री, नंदू हळदणकर, सुनील गिरगावकर, साईराज वायंगणकर, भालचंद्र माळवदे, अनुराधा नांदोसकर, हरेश तोरसकर, विठ्ठल राणे, गणेश जंगले यांच्यासह अन्य उपस्थित होते.
----------------
चौकट
अशी राबविली ड्रॉ पद्धत
जिल्ह्यातील एकूण २५० भजनी मंडळाना हा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या ५० जिल्हा परिषद मतदार संघात प्रत्येकी पाच मंडळांना लाभ देण्यात आला. यासाठी मतदार संघात पाच पेक्षा जास्त गाव असल्यास त्या गावांची नावे प्रथम बॉक्समध्ये टाकून त्यातून सोडत काढत पाच नावे प्रथम निवडण्यात आली. लकी ठरलेल्या पाच गावांतील प्रत्येक गावातून एकापेक्षा जास्त प्रस्ताव आले असल्यास त्या सर्व मंडळांची नावे बॉक्समध्ये टाकून एक नाव ड्रॉ पद्धतीने निवडण्यात आली. एखाद्या गावातून एकच प्रस्ताव असल्यास त्याच मंडळाची निवड करण्यात आली. ड्रॉ पद्धतीने नाव आलेल्या गावातून एकही प्रस्ताव आला नसल्यास दुसऱ्या गावाची पुन्हा सोडत पद्धतीने निवड करण्यात आली. अशा पद्धतीने पूर्ण ५० मतदार संघासाठी सोडत राबविण्यात आली.

चौकट
लहान मुलाच्या हस्ते लॉटरी
या सोडत पद्धतीचा दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी जिल्हा परिषद मतदार संघापासून प्रारंभ करण्यात आला. देवगड तालुक्यातून सोडतसाठी आलेल्या एका लहान मुलाच्या हस्ते या मतदार संघातील ११ गावांच्या नावातून पाच गावांची लॉटरी काढण्यात आली. त्यानंतर त्याच मुलाच्या हस्ते या पाच गावातील प्रत्येक गावामधून आलेल्या प्रस्तावातून एका मंडळाची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली.

कोट
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवारी (ता.१०) सकाळी ११ वाजता येथील शरद कृषी भवन येथे ५० भजनी मंडळाना साहित्य वाटप करण्यात येणार आहेत. मृदुंगमनी, पाच टाळ आणि चकवा असे साहित्य वितरीत केले जाणार आहे.
- विशाल तनपुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com