
उपवडे पुलावरून वाहतूक सुरू करण्याची मागणी
28992
कुडाळ ः सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपअभियंत्यांना निवेदन देऊन चर्चा करताना वसोली सरपंच आदी.
उपवडे पुलावरून वाहतूक
सुरू करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
माणगाव, ता. ८ ः नव्याने बांधण्यात आलेल्या उपवडे पुलावरून वाहतूक सुरू करण्याची मागणी वसोली सरपंच अजित परब यांनी केली आहे. कुडाळ येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपअभियंत्यांना तसे निवेदनही देण्यात आले.
आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांतून उपवडे नदीवर पावणेतीन कोटी रुपये खर्चून पूल उभारण्यात आला आहे. या पुलावरून वाहतूक बंद असल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. उपवडे तेरगळ वाडीतून सहा ते सात किलोमीटर पायी जावे लागत आहे. या मार्गाने अन्य कोणतेही वाहतुकीचे साधन नसल्याने प्रवाशांना एसटी बसवर अवलंबून राहावे लागते. गणेश चतुर्थी जवळ आल्याने येणाऱ्या चाकरमानी व ग्रामस्थांची व्यवस्था व्हावी, याकरिता गणेशोत्सवापूर्वी वाहतूक सुरू व्हावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, उपसरपंच सदानंद गवस, महादेव राऊळ, संतोष राऊळ, तुषार परब, स्वप्नील पाटकर आदी उपस्थित होते.