रत्नागिरी- एकाच विषयात विद्यार्थ्यांना शून्य गुण
फोटोओळी
-rat१०p४.jpg-KOP२३M२९४७६ रत्नागिरी ः मुंबई विद्यापीठाबाबतच्या अनेक समस्यांबाबत अभाविपतर्फे उपकेंद्रात डॉ. सुखटणकर यांच्याकडे निवेदन देताना शिष्टमंडळ.
एकाच विषयात विद्यार्थ्यांना शून्य गुण
अभाविपचे निवेदन ; विद्यापीठ उपकेंद्र असूनही तक्रार मुंबईत का?
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांच्या बाबतीत अनेक समस्या विद्यार्थ्यांना जाणवत आहेत. यासंदर्भात विद्यापीठाच्या चरित्रकार धनंजय कीर उपपरिसराकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवेदन दिले. ओएसएममार्फत स्कॅन करून देखील एकाच महाविद्यालयातील एका विषयातील सर्व विद्यार्थ्यांना शून्य गुण दिल्याची घटना देखील येथे घडली. त्या विद्यार्थ्यांना मुंबईला विद्यापीठाच्या परीक्षा विभागात जाऊन तक्रार करावी लागली. मग विद्यापीठाचे उपकेंद्र असून त्याचा उपयोग काय? या विषयासाठी लागणारी योग्य यंत्रणा इथेच उभारण्याची मागणी अभाविपने निवेदनातून केली आहे.
मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणार्या रत्नागिरी जिल्ह्यामधील विविध समस्यांबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांची भेट घेतली. याप्रसंगी जिल्हा संयोजक अनुष्का राणे, प्रसाद जांगळे, शहर मंत्री यश खेर आदी उपस्थित होते.
विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चौथ्या सत्राच्या परीक्षा जून महिन्यात संपल्या होत्या. या परीक्षा होऊन ७५ दिवस उलटून गेले आहेत तरीही या विद्यार्थ्यांचे निकाल अजूनही प्रलंबित आहेत, ते लवकरात लवकर लावावेत. आयडॉल विभागातील विद्यार्थ्यांना उपकेंद्रात वेळेत स्टडी मटेरीअल मिळत नाही. यात आपण विशेष लक्ष देऊन विद्यार्थांना वेळेवर स्टडी मटेरीअल उपलब्ध करून द्यावे. विद्यापीठाचे जीआर विद्यार्थ्यांना वेबसाईटवर मिळावेत. जीआर महाविद्यालयात वेळेवर मिळावेत.
विद्यापीठातील पेपर तपासणीमध्ये अनेक त्रुटी आढळून येत आहेत. ज्यामध्ये मुख्यतः अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण दिले जात आहेत आणि पेपरचे पुनर्मुल्यांकन केल्यानंतर गुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. यामुळे पेपर तपासणी प्रक्रियेत सुधारणा व्हावी मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन केंद्राच्या अंतर्गत व बहिस्थ परीक्षामध्ये वेळापत्रक, परीक्षा केंद्र आणि हॉल तिकीट यामध्ये अनेक घोळ पाहायला मिळाले आहेत. असे घोळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे निकाल हे एटीकेटी परीक्षांचे अर्ज निघण्यापूर्वी लावावेत. उपकेंद्र परिसरात उपकेंद्राचे स्वतंत्र उपहारगृह सुरू करण्यात यावे, आदी मागण्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केल्या.
चौकट १
कर्मचारी भरती त्वरित करावी
उपकेंद्र परिसरात पदव्युत्तर अभ्यासक्रमांमधील विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमांसोबत कला आणि वाणिज्य शाखांच्या देखील नियमित तासिका सुरू व्हाव्यात. कोकणातील परिस्थितीला अनुसरून काही अभ्यासक्रम उपकेंद्र परिसरात सुरू करण्यात यावेत. उपकेंद्र परिसरात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या अपेक्षित संख्येपेक्षा कमी आहे. त्यामुळे येथे आपल्या विविध कामांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची कामे रखडतात. त्यांना या कामांसाठी मुंबईला विद्यापीठात जावे लागते. यात प्रलंबित विविध भरतींच्या माध्यमातून या प्रलंबित जागा त्वरित भराव्यात.