
तीन लाखांची दारू इन्सुलीत जप्त
30976
इन्सुली ः येथे जप्त केलेल्या मुद्देमाल व संशयित याच्यासाह राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी व कर्मचारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
तीन लाखांची दारू इन्सुलीत जप्त
राज्य उत्पादन शुल्कची कारवाई ः आंध्रप्रदेशमधील दोघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने कारवाई करत आंध्रप्रदेशातील दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाखांची दारू व १० लाखांची मोटार, असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कालापला राजेश (वय ४०) व अप्पानी रसी किरण (वय २६, दोघेही रा. आंध्रप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. आज सकाळी इन्सुली तपासणी नाका येथे ही कारवाई करण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की गोव्याहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची इन्सुली तपासणी नाका येथे नेहमीप्रमाणे तपासणी होत होती. दरम्यान गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणारे (एपी२१ एई ०१११) ही मोटार आली असता येथील कर्मचारी यांनी तपासणीसाठी थांबण्याचा इशारा केला. मोटारीची तपासणी केली असता पाठीमागील हौद्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचा बेकायदा साठा असल्याचे समोर आले. यामध्ये विदेशी मद्याच्या चक्क सहाशे दारूच्या बाटल्या आढळल्या. पथकाने ३ लाख रुपये किमतीची दारू व १० लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण १३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. इन्सुली तपासणी नाका निरीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरिक्षक तानाजी पाटील, प्रदीप रासकर, सहाय्यक दुय्यम निरिक्षक गोपाळ राणे, प्रसाद माळी, रणजित शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर अधिक तपास करीत आहेत.