विविध विकासकामांना जिल्ह्यात गती
31097
ओसरगाव : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले सुविधा केंद्र.
पालकमंत्र्यांकडून महामार्गाबाबत वचनपूर्ती
भाजप जिल्हाध्यक्ष सावंत ः इतर विकासकामांनाही जिल्ह्यात गती
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अखत्यारित कार्यरत असणारा सार्वजनिक बांधकाम विभाग एकजुटीने अहोरात्र मेहनत घेत विकासकामांना आकार देत आहे. जाहीर केल्याप्रमाणे मुंबई-गोवा सिंगल लेन महामार्ग पूर्ण झाला आहे. त्यासोबतच आता गणेशभक्तांसाठी आणखी एक उपक्रम राबविताना विभागाच्या वतीने गणेशभक्तांसाठी सुविधा केंद्रे उभारली आहेत, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे, की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अशी अनेक केंद्रे कार्यरत होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण ते झारापपर्यंत चार पॉईंटवर उभारलेल्या स्वागत व सुविधा केंद्रातून सेवा सुरू झाली आहे. या प्रशस्त अशा सुविधा केंद्रांमार्फत आरोग्यसेवा, पोलिस मदत केंद्र, मोफत चहा-बिस्कीट स्टॉल, चालकांसाठी विश्रांती कक्ष, फोटो गॅलरी आणि मोबाईल शौचालय आदी मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. जेणेकरून गणेशभक्तांच्या प्रवासातील थकवा कमी होईल, अपघात होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल.
पालकमंत्री चव्हाण यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. लाखो गणेशभक्त या सेवेचा लाभ घेतील. चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला नाउमेद करण्यासाठी टीकाकारांची फौज नेहमीच तैनात असते; पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत काम करणे ही पालकमंत्री चव्हाण यांची खासियत आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भाजप सेवा आणि सुशासन यावर भर देतो, या विधानाला या उपक्रमांतून पुष्टी मिळाली आहे. आज ओसरगाव टोल नाक्याजवळ उभारलेल्या सुविधा केंद्राला भेट दिली. तिथे भेट झालेल्या प्रवाशांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील नागरिकांनी मुंबई-पुण्याहून येणाऱ्या आप्तेष्टांना या सुविधा केंद्रांबाबत माहिती द्यावी, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.