भराडी आईचा महिमा
swt16.jpg
M68430
आंगणेवाडी येथील मंदिर
swt17.jpg व swt18.jpg
M68431, M68432
आंगणेवाडीः यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरात आकर्षक फुलांची आरास केली आहे. (छायाचित्रः प्रशांत हिंदळेकर)
भराडी आईचा महिमा
लीड
आंगणेवाडी...! मालवण शहरापासून १५ किलोमीटरवर वसलेली मसुरे गावाची छोटीशी वाडी; पण या गावात वास्तव्य करून असलेल्या श्री भराडी आईच्या कृपाशीर्वादामुळे या गावाची महती राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून आज आंगणेवाडीची ओळख बनलीय ती भराडी आईच्या जागरूकतेमुळे. याठिकाणी केलेला नवस कधीही वाया जात नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे, म्हणूनच दरवर्षी भराडी देवीच्या वार्षिक जत्रेला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. शनिवारी (ता.२) आंगणेवाडीच्या भराडी देवीची वार्षिक जत्रा साजरी होतेय. आंगणेवाडी पाठोपाठ यंदा कुणकेश्वरची जत्रा आल्याने यंदा दोन्ही ठिकाणी विक्रमी संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १२ ते १५ लाख भाविक यंदा यात्रेत उपस्थिती दर्शवतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यातून कोट्यावधींची उलाढाल येथे होणार आहे.
- प्रशांत हिंदळेकर, मालवण
आंगणेवाडी या शब्दाचा महिमाच अपार आहे. हा शब्द कानी पडताच प्रत्येकाच्या नजरेसमोर येते ती दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होणारी श्री देवी भराडीची यात्रा. सर्व जाती, धर्म आणि पंथातील भाविकांना सामावून घेणारी ही यात्रा राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे. या यात्रेस सर्वसामान्य नागरिकांबरोबरच राजकीय नेते, बडे व्यावसायिक, उद्योजक, कलाकार, खेळाडू असे सर्वचजण उपस्थिती दर्शवतात. दरवर्षी दीड दिवस साजरी होणारी आई भराडीची यात्रा म्हणजेच आंगणेवाडी यात्रोत्सवातील भाविक आणि व्यावसायिक यांच्यासाठी मोठी पर्वणीच असते. दरवर्षी येथे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. नवसाला पावणारी देवी म्हणून श्री देवी भराडी भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे यात्रोत्सव काळात देवीची ओटी भरण्याबरोबरच तिला नवस करण्यासाठी आणि पूर्वीचे नवस फेडण्यासाठी भाविकांची येथे गर्दी उसळते. अनेक भाविक नवस फेडीसाठी तुलाभारही करतात. यात्रोत्सवास दरवर्षी होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनही गेल्या काही वर्षांपासून ''आंगणेवाडी यात्रोत्सव विशेष रेल्वे गाड्या सोडत आहे. यावरून या यात्रोत्सवाचा आवाका लक्षात येतो.
आंगणेवाडी यात्रा ही चाकरमान्यांची यात्रा म्हणून ओळखली जाते. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात स्थायिक झालेले चाकरमानी आंगणेवाडी यात्रेला उपस्थिती दर्शवतात. गावातील माहेरवाशिणी देखील कुठेही वास्तव्याला असल्या तरी न चुकता यात्रेला गावात उपस्थिती लावतात. या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी असल्याने साहजिकच राजकारण्यांसाठी देखील ही यात्रा म्हणजे एक पर्वणीच असते. म्हणूनच दरवर्षी व्हीव्हीआयपी नेतेमंडळी मोठ्या संख्येने यात्रेला उपस्थिती दर्शवतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यंदा यात्रेला उपस्थिती दर्शवणार आहेत. भाजप, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि अन्य पक्षाचे नेते देखील भराडी आईच्या या वार्षिकोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत.
खरं म्हणजे आंगणेवाडी हे गाव मसूरे गांवातील बारा वाड्यांपैकी ही एक वाडी आहे; पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गांवच असल्याचा समज सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाला आहे. श्री भराडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची आख्यायिका आहे. आंगणे नामक ग्रामस्थांची गाय नेहमी रानातील एका विशिष्ट ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी, देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे जाणकार सांगतात. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करु लागले. ‘भरड’ भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरुपी देवी अवतरली म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात. नवसाला पावणाऱ्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे. जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो. या देवीचा जत्रोत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. सामान्यपणे दिवाळीनंतर ग्रामस्थ देवीला कौल लावून शिकारीला जातात. जोपर्यंत शिकार मिळत नाही, तोपर्यंत पुढील काम होत नाही. जेव्हा शिकार मिळते व तिचे ग्रामभोजन होते, त्यानंतर ग्रामस्थ एकत्र येऊन चर्चा करुन आणि देवीला कौल लावून जत्रोत्सवाचा दिवस निश्चित करतात. कोणत्याही ठिकाणची जत्रा संपली की तेथील मानकरी आणि गावकरी सुटकेचा नि:श्वास सोडतात; पण आंगणेवाडीवासिय जत्रा संपल्यानंतर तातडीने पुढच्या वर्षीच्या जत्रेच्या नियोजनाला लागतात. यंदाच्या वर्षी कोणत्या त्रुटी राहिल्या का0 याचा अभ्यास यावेळी करून पुढच्या जत्रेची तयारी सुरु केली जाते. यंदाच्या वर्षी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत.
चौकट
मोडजत्रा म्हणूनही प्रसिध्द
आंगणेवाडीची जत्रा साधारण दीड दिवस चालते, दुसऱ्या दिवशी साधारण दुपारी तीन-चारच्या मानाने व्यापारी लावलेली दुकाने मोडायला घेतात. म्हणून दुसऱ्या दिवशीच्या जत्रेला मोडजत्रा असे म्हणतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

