बालक-पालक ः बरू आनंदे
बालक-पालक : बहरू आनंदे ........... सदर
(२५ ऑक्टोबर टुडे ४)
पूर्ण दिवसाचे निरोगी मुल जन्मापासूनच शिकण्यासाठी तयार असते. आई आणि मुलांमधला संवाद बोली भाषा समजण्याआधीच सुरु झालेला असतो व मूल आईकडून खूप काही शिकत असते त्यामुळे आईची मानसिकता प्रसन्न आणी धीराची असणे महत्वाचे. मुलांच्या आयुष्यात खेळाचे अनन्यसाधारण महत्व आहे. मूल खेळातून, गमतीतून जास्त शिकते. खेळताखेळता मुलांच्या मेंदूचीवाढ झापाट्याने होते व त्यांची शिकण्याची क्षमता वाढते.
- rat३१p२.jpg
P24N22386
- श्रुतिका कोतकुंडे
सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण
sajagclinic@gmail.com
-----
मुलांच्या भावनिक गरजा
पालकांनी मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी या गोष्टी कराव्यात.
* मुलाशी खेळता खेळता आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल संवाद साधावा
* मुलाला स्वतः व्यक्त व्हायला मदत करावी
* मुलाशी गमती जमतीतून विविध गोष्टींची समज वाढण्यास मदत करावी
* पुस्तकं किंवा विडियो बघताना काय बघतोय त्याचे वर्णन करण्यास प्रोत्साहन द्यावे.
* मुलांना गोष्टी सांगाव्यात व मुलासोबत आवडीची विविध पुस्तके वाचावीत. त्यामुळे त्यांना वाचनाची आवड लागेल आणी बुद्धीला चालना मिळेल.
* स्क्रीन टाइमवर घरातील सर्वांनी बंधन पाळावे
- मुलांना वळण कसे लावावे
मुलांची चूक-बरोबर याबद्दल समज वाढवणे हा पालकत्वाचा एक महत्त्वाचा भाग असला तरीही सांगण्यापेक्षा मुलं कुटुंबियांच्या वागण्यावरूनच बरंच काही शिकत असतात हे जाणावे.
* चांगल्या वागण्याचे कौतुक करावे, वाईट वागण्याकडे दुर्लक्ष करावे, समजावून सांगावे
* मूल चांगले वागल्यास बक्षीस म्हणून माया करावी, पाठ थोपटावी, चार लोकात कौतुक करावे.
* वस्तू रूपात बक्षिस देणे शक्यतो टाळावे. चांगले वागल्यास क्वचितच वस्तू, चॉकलेट किंवा पैसे देण्यास हरकत नाही पण नेहेमी नको.
* मूल वाईट वागत असल्यास त्यांचे लक्ष इतर कुठेतरी वळवावे. वाईट वागण्याला नापसंती दर्शवल्याने मुलांचे वाईट वागणे कमी होते. चार चौघामध्ये टिका करू नये.
* आई आणि वडिलांमध्ये वागण्यात समानता, सातत्य व एकजूट असावी जेणे करून मुलाला नियम पाळण्यास प्रोत्साहन मिळते.
* शिस्त लावण्यासाठी मुलांना मारणे टाळावे. पालक जर मुलांना सतत मारत असतील तर पालक आणी मुलांमधील संवाद खुंटतो.
- आत्मनिर्भरतेस प्रोत्साहन
मूल जसे मोठे होते, तसे त्यांना जबाबदार बनण्यास प्रोत्साहन द्यावे. मुलांमध्ये निर्णयक्षमता वाढण्यासाठी घरातील सर्व निर्णयात सहभागी करून घ्यावे व निर्णय कसे घ्यावे याबद्दल मार्गदर्शन करावे. मुलांना त्यांचे छोटे निर्णय घेऊ द्यावेत व चुकांमधून शिकू द्यावे. मुलाच्या मतांचा आदर करावा.
पालकांचा, शिक्षकांचा, मित्रांचा मुलाचे व्यक्तिमत्व घडवण्यात महत्त्वाचा सहभाग असतो. इतरांशी कसे वागायचे हे मूल आपल्या पालकांकडून सतत शिकत असते. त्यामुळे पालकांनी निकोप नाती जपावी व चांगले उदहरण बनावे. पालकांनी मुलांमधील विविध गुणांना वाव द्यावा, त्यांना त्यांच्या गतीने फुलू द्यावे बहरू द्यावे. मूल हळवे, चंचल असल्यास त्यांना आधाराने संयमाने वागवावे, त्यांची तुलना इतरांशी करू नये. मुलांना मित्र मैत्रिणी जोडण्यास मदत करावी कारण मैत्रीमधूनच मूल हळू हळू शालेय जीवनाला भिडण्यासाठी तयार होत असते.
- स्वाभिमान व आत्मविश्वास वाढवणे
मुलांना हल्ली खूप कमी वयापासून स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. शाळेत, घरी त्यांची सतत तुलना होत असते. त्यामुळे मूल शिकण्यातील आनंद हरवून बसते. मुलावरचे दडपण कमी केल्यास मूल एखादी नवीन गोष्ट निसंकोचपाने अनुभवण्याची मजा घेऊ शकेल. मुलांसाठी उद्दिष्टे डोईजड नसावित, त्यांच्या महत्त्वाकांक्षा व क्षमता यांचा योग्य समतोल साधणारी असावित. अपयश मिळाल्यास मुलांना अपमानित करू नये, टोमणे मारू नये. प्रयत्न केल्याचे कौतुक करावे व पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. पालकांनी मुलाच्या यशाशी प्रेमाची सांगड घालू नये. मुलांना यश मिळो अगर ना मिळो, त्यांना पालकांचे अनिर्बंध प्रेम मिळत राहील हा विश्वास असू द्यावा. अपयशामुळे मूल खजिल झाल्यास त्याला भूतकाळातले यशाची जाणीव करून द्यावी व त्यांना व्यक्त होण्यास मदत करावी.
पालकांनी मुलांच्या गुणांचा कस लागेल अशा छोट्या-छोट्या संध्या त्यांना उपलब्ध करून द्याव्या. अभ्यासाबरोबर घरगुती कामात त्यांना सहभागी करावे जबाबदाऱ्या द्याव्यात. तसेच घरातील, शेजारच्या लहान थोरांशी प्रेमानी वागण्यास प्रोत्साहित करावे. पालकांनी स्वतःच्या अपयशाबद्दल मुलांशी चर्चा करावी व आपण कसा मार्ग काढला याबद्दल चर्चा करावी.
आजच्या झापाट्याने बदलत्या जगात पालकत्व सोपे नाही. आपले मूल एकदाच मोठे होणार आहे, त्यामुळे वेळात वेळ काढून पालकांनी त्यांच्यावर योग्य संस्कार केल्याने, त्यांच्याशी संवाद साधल्याने हा प्रवास दोघांनाही आनंद देणारा आणि समृद्ध करणारा होऊ शकतो हे नक्की.
पालकांनी घरातील वातावरण सहज, आनंदी आणी आधाराचे राखण्यासाठी प्रयत्न करावा जेणेकरून मूल त्यांच्या प्रेमाच्या सावलीत भरभरून जोमाने वाढेल आणी बहरेलही. या वाटेवर जरी काही अपघात, आघात घडले तरी ते पचवण्याची ताकद मुलांमध्ये घडवूया आणी मुलांची मानसिकता कणखर बनवूया.
(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

