निवडणुक पानासाठी-दोडामार्गातील मतांना आली किंमत

निवडणुक पानासाठी-दोडामार्गातील मतांना आली किंमत

Published on

दोडामार्गातील मतांना आली किंमत
उमेदवारांची नजरः शक्तिप्रदर्शनात दिसली झलक
संदेश देसाईः सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३१ः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आघाडी आणि महायुतीत चुरस असतानाच दोन्ही गटात बंडखोरी झाल्याने मतांची गोळा बेरीज करण्यासाठी सगळेच प्रमुख पक्ष चाणक्यनिती आजमावताना दिसत आहेत. प्रत्येक मत महत्वाचे झाल्याने दोडामार्ग तालुक्याला आपल्याकडे वळवण्यासाठी चारही प्रमुख उमेदवारांमध्ये चुरस वाढली आहे.
महायुतीकडून दीपक केसरकर तर महाविकास आघाडीकडून राजन तेली यांना पक्षाकडून मिळालेली अधिकृत उमेदवारी व विशाल परब आणि अर्चना घारे यांनी वरिष्ठांच्या नाराजी पत्करत केलेली बंडखोरी यामुळे सावंतवाडीतील चुरस वाढली आहे. चारही उमेदवारांचा जनसंपर्क पाहता समतुल्य मतदान होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे परस्परविरोधी उभे असलेल्या चारही उमेदवारात धडकी भरली असून मतांच्या बेरजेची गणिते मांडली जात आहेत.
या स्पर्धेत भाजप, शिवसेना (शिंदे गट), ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका उमेदवारांसाठी महत्वाची ठरत आहे. मनातील राजकारण, सहानुभूती दर्शविण्यासाठी तोंडावर केली जाणारी स्तुती आणि त्यापलीकडे डोक्यात शिजणारे राजकारण याचा भाव काही कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटत आहे. मनात ठरवून कावेबाजपणा करणारे, स्पष्टपणे विरोध दर्शविणारे आणि चाणक्य नितीचा वापर करून मतदान फोडून नामनिराळे राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा वावर ठळक झाला आहे. त्यामुळे चारही उमेदवारांसाठी एक-एक मत महत्वाचे ठरत आहे.
गत विधानसभेच्या निवडणुकीत इच्छुक असूनही पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने पक्षाचे हित जोपासण्यासाठी अर्चना घारे यांनी बबन साळगावकर यांना संधी दिली होती. त्यांच्या प्रचारातही त्या होत्या; पण साळगावकरांना विजय मिळवता आला नाही. आता ते राजन तेलींच्या प्रचारात सक्रिय आहेत. घारेंनी बंडखोरी केली आहे. तिकडे महायुतीत उमेदवारी शिंदे शिवसेनेच्या केसरकरांना मिळाल्यानंतर तेलींना थेट ठाकरे शिवसेना गाठत महाविकासचे तिकीट मिळविले. मात्र, भाजपमधील अन्य इच्छुक विशाल परब यांनी बंडखोरी केली. या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार, हे सांगणे कठीण बनले.

चौकट
शक्तिप्रर्दशनात दोडामार्ग तालुक्यातून आलेल्यांची संख्या जास्त
या मतदारसंघात सावंतवाडीसह दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यांचा समावेश आहे. वेंगुर्ले हा अन्य दोन तालुक्यांच्या तुलनेत किनारपट्टी असल्याने वेगळ्या सामाजिक रचनेचा आहे. सावंतवाडीशी चारही उमेदवारांचा नेहमीचा ''टच'' आहे. या पार्श्वभूमीवर उरलेल्या दोडामार्गमधील जास्तीत जास्त मते आपल्याकडे खेचण्यासाठी छुपी व्यूहरचना केली जात आहे. प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल करताना केलेले शक्तिप्रर्दशनात दोडामार्ग तालुक्यातून आलेल्यांची संख्या जास्त होती. यातच याची झलक मिळत आहे. विशेषतः बचतगटांना आपल्याकडे वळवण्यासाठी उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. बैठका, नियमित संपर्क वाढला आहे. एकूणच या निवडणुकीत तालुक्याचा मूळ रहिवाशी असलेला उमेदवार फारसा स्पर्धेत नसला तरी मतांचे महत्व मात्र वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com