फ्लॅश बॅक - १२

फ्लॅश बॅक - १२

Published on

फ्लॅश बॅक - १२

सिंधुदुर्गात काँग्रेस
रुजविणारे नेते
- शिवप्रसाद देसाई
समाजवादी विचारसरणीच्या नेत्यांनी सिंधुदुर्गाचे समजवादी बिरादरिकाळाने नृत्य केले असले तरी बहुसंख्य ग्रामीण भागात काँग्रेसच रुजली होती. यात सावंतवाडी मतदारसंघावर निवडणुकीपर्यंत काँग्रेसचे वर्चस्व राहिले. १९८५ च्या निवडणुकीपर्यंत तब्बल पाच वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केलेल्या शिवरामराजे भोसले यांच्यासह प्रतापराव भोसले, भाईसाहेब सावंत यांचा यात महत्त्वाचा वाटा होता.
सिंधुदुर्गात काँग्रेसचा विधानसभेतील राजकारणाचा विचार करता सावंतवाडीत या पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट असल्याचे जाणवते. पूर्वीपासून राजापूर लोकसभा मतदारसंघावर समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता. सुरवातीच्या काळात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी कोल्हापुरला जोडला होता. १९६२ च्या दरम्यान मतदारसंघ पूर्ण विलोकसनासाठी नेमलेल्या समितीत काँग्रेसच्या नेत्यांनी सावंतवाडी राजापूरला जोडण्याचा आग्रह धरला. याचे मुख्य कारण म्हणजे सावंतवाडीत काँग्रेसची पाळेमुळे घट्ट होती. त्याच्या जोरावर राजापूर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व समाजवाद्यांकडून काँग्रेसकडे मिळविण्याचा हेतू होता. पुढे सावंतवाडी राजापूरला जोडली; मात्र राजापूरवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. तरीही सावंतवाडी काँग्रेसच्या प्रभाव मात्र दीर्घकाळ राहिला.
या मतदारसंघात काँग्रेसचे पहिले आमदार म्हणून प्रतापराव भोसले निवडून आले. ते मूळचे तिरोडा (ता. सावंतवाडी) गावच्या खाशे घराण्यातील. राजकीय कारकिर्दीत त्यांच्या कर्तबगारीबरोबरच घराण्याविषयी लोकांमध्ये असलेल्या आदराचाही वाटा मोठा आहे. त्यांनी सावंतवाडीसह वेंगुर्ले मतदारसंघाचेही प्रतिनिधीत्व केले.
भाईसाहेब सावंत यांचाही काँग्रेसच्या वाढीत वाटा आहे. त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री पदही भूषविले. त्यांचे घराणे माजगाव (ता. सावंतवाडी) येथील. त्यांनी ग्रामीण भागात संघटना वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला; मात्र ते कधीही लोकांमधून निवडून विधानसभेवर गेले नाहीत. अखंड रत्नागिरी जिल्हा असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
सावंतवाडी संस्थानचे शिवरामराजे भोसले यांचा येथे काँग्रेसची पाळेमुळे घट्ट करण्यात सिंहाचा वाटा होता. दिलदार, बुद्धीमान, कलासंपन्न असलेल्या शिवराम राजेंची मतदारसंघातील इमेज खऱ्याअर्थाने ‘रॉयल’ होती. १३ ऑगस्ट १९२० ला जन्मलेल्या शिवरामराजे यांनी विधानसभेच्या राजकारणात एक वेगळी तेजस्वी वलय निर्माण केले. १९५७ च्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने समाजवाद्यांनी त्यांना विधानसभेच्या राजकारणात आणले. येथे काँग्रेसचा पराभव करणे शक्य नसल्याने समाजवादी नेत्यांनी राजेसाहेबांना निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. त्यांनी ती विनंती मान्य केली; मात्र अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. पहिल्याच निवडणुकीत स्वतःच्या ताकदीवर ९२ टक्के मते घेऊन मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यानंतर १९६२, १९६७, १९८०, १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी निर्विवाद विजय मिळविला.
अपक्ष म्हणून निवडून आल्यावर १९६१ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजेसाहेबांच्या आगमनाबरोबरच सावंतवाडी मतदारसंघात काँग्रेस फोफावत गेली. उघड्या जीपमधून राजबिंडे राजेसाहेब गावोगाव प्रचारसभा घ्यायचे तेव्हा सगळा थाट प्रभावित करणारा असायचा. गावोगावच्या लोकांच्या हृदयात त्यांचे स्थान होते. आजही ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये घराघरात राजेसाहेबांची तसबीर लावलेली दिसते.
त्या काळात राजेसाहेब म्हणजे विजय असेच समीकरण होते. ’कुंदा, चंदा, मंदा, तुम्ही मतदान करण्याच्या वयाच्या झाल्यात ना यंदा, मग काँग्रेसलाच मत द्या’ ही घोषणा त्या काळात प्रसिद्ध होती. विजयानंतर राजेसाहेब मतदारसंघात जायचे. उघड्या जीपमधून स्वतः गाडी चालवत राजेसाहेब येवू लागले की घोषणा दिली जायची. आले रे आले काँग्रेसवाले, कशाला आले? सांगायला आले, शिवरामराजे निवडून आले.
काँग्रेससाठी त्यांचे योगदान मोठे होते. मंत्रालय स्तरावरही त्यांचा मान मोठा होता. त्यांनी - काँग्रेसचे प्रतोतपद सांभाळले. विधानसभा रुलमेकिंग समितीसह अनेक राज्यस्तरीय समित्यांवर काम केले. त्यांनी विधानसभेबरोबरच लोकसभाही लढविली. १९७१ आणि १९८९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी मधू दंडवतेंविरोधात काँग्रेसचे प्रतिनिधीत्व केले. यात विजय मिळाला नसला तरी त्यांना मिळालेली मते लक्षणीय होती.
१९६५ मध्ये चीनविरुद्ध युद्ध पेटले. यावेळी राजेसाहेब आमदार होते. तत्कालीन संरक्षणमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्याकडून विशेष परवानगी घेऊन ते देशासाठी लढले. इतकी तेजस्वी कारकीर्द असूनही राजेसाहेब कधी मंत्री झाले नाहीत. कदाचित त्यांना मंत्रिपद मिळाले असते तर त्या पदाचा मान वाढला असता. राजेसाहेबांचे १३ जुलै १९९५ ला निधन झाले.
(क्रमश:)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com