प्लास्टिकमुक्तिसाठी ३ हजार चिपळूणकर उतरले रस्त्यावर

प्लास्टिकमुक्तिसाठी ३ हजार चिपळूणकर उतरले रस्त्यावर

Published on

ratchl२०१.jpg
71919
चिपळूण ः सामूहिक स्वच्छता अभियानात सहभागी झालेले चिपळूणकर.
ratchl२०२.jpg ः
71920
संकलीत केलेला कचरा घंटागाडीतून नेण्यात आला.
- ratchl२०३.jpg ः
71921
कचरा संकलन करताना अधिकारी व नागरिक.
- ratchl२०४.jpg ः
71922
प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती पत्रकाचे वाटप करताना अभिनेता ओंकार भोजने, प्रांताधिकारी व मुख्याधिकारी.

प्लास्टिकमुक्तिसाठी चिपळूणकर एकवटले
प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद; तीन हजार नागरिकांकडून दोन तासांत सव्वासहा टन कचरा संकलन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० : शहरातील रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, गटारात अडकलेले कागद व प्लास्टिक बाटल्या यासह अन्य प्लास्टिक कचरा संकलनासाठी प्रांताधिकारी आकाश लिगाडे व मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या आवाहनाला चिपळूणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळा, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्यासह सुमारे ३ हजार लोकांनी शहरात ११ ठिकाणी स्वच्छता केली. शुक्रवारी (ता. २०) सकाळी दोन तास रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी सव्वासहा टन प्लास्टिक कचरा गोळा केला.
प्रांताधिकारी कार्यालय, चिपळूण नगरपालिका व प्रशासन यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२५, माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत लिगाडे व भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण शहरात आज सकाळी ८ वाजता एकाचवेळी ११ ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. त्यासाठी अकरा टीम तयार करण्यात आल्या होत्या. चिपळूणमधील १३ शाळांमधील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये, व्यापारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह सामान्य नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. मराठी अभिनेता ओंकार भोजने यांनी चिपळूण पालिकेच्या घंटागाडीतून जनजागृती करत व्यापाऱ्यांना प्लास्टिकमुक्तीचे पत्रक वाटप केले. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारीही शहरात फिरले.
ही मोहीम राबवत असताना चिपळूण नगरपालिकेने शहरात ''नो प्लास्टिक झोन'' ची घोषणा केली आहे. चिपळूण शहराच्या पूरमुक्तीकरिता प्रशासनाकडून छोटे-मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्यापैकी प्लास्टिक संकलन मोहीम हा एक आहे. पुराच्या पाण्यासोबत वाहत जाणारा प्लास्टिक कचरा, बाटल्या, रॅपर्स आदी कचरा आजच्या या सामूहिक स्वच्छता मोहिमेत गोळा करण्यात आला. गोळा केलेल्या कचऱ्याचे संकलन करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. त्यासाठी पालिकेच्या घंटागाड्या रस्त्यावर उतरलेल्या होत्या.
भोजने यांना स्वच्छतेचा अधिकृत ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्‍तिपत्र देण्यात आले. यावेळी ते म्हणाले, मी केवळ ब्रँड अँबेसिडर नसून, या चळवळीचा एक कार्यकर्ता आहे. चिपळूणमधील प्रत्येक सुजाण नागरिक या मोहिमेचा खरा ब्रँड अँबेसिडर आहे. स्वच्छता ही केवळ सरकारी जबाबदारी नसून, प्रत्येकाची व्यक्तिगत बांधिलकी आहे. तरुणांनी कला, साहित्य, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांतून पुढे येऊन स्वच्छतेच्या लढ्यात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पार पडलेल्या समारोप कार्यक्रमावेळी आमदार शेखर निकम यांनी हजेरी लावली. ते म्हणाले, या मोहिमेतील विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छतेविषयी निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेऊन प्रशासनाने जनजागृती करावी. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू.
स्वच्छता समारोपावेळी गांधारेश्वर तिठा येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी डॉ. यतीन जाधव, प्रकाश देशपांडे, कवी अरुण इंगवले, मुख्याधिकारी विशाल भोसले, माजी नगरसेवक आशिष खातू, रामशेठ रेडीज, सीमा चाळके, मनोज शिंदे, रसिका देवळेकर, मिलिंद कापडी, शहानवाज शहा आदी उपस्थित होते. त्यानंतर कळंबस्ते येथे लिगाडे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या देवराईला भोजने यांनी भेट दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित जाधव यांनी केले.

--------
दृष्टिक्षेपात...

कचऱ्याचे वर्गीकरण

* प्लास्टिक पिशव्या व रॅपर्स १२२७ किलो
* काचेच्या बाटल्या २३५५ किलो
* प्लास्टिक बाटल्या १७२२ किलो
* कापडी पिशव्या व कापड ८२० किलो
* थर्माकॅाल १५५ किलो

------
कोट
शहरात ज्या दुकानासमोर प्लास्टिक, चहा कप वगैरे पडलेले दिसतील त्या दुकानदाराकडून दंड घ्यायला हवा. पोलिस जसे नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यांचे फोटो काढून थेट बँकखात्यातून दंड वसूल करतात त्या धर्तीवर हे काम करता येईल. बाजारात सर्रास पातळ प्लास्टिक पिशवी मिळते. या पिशव्या देणारा देत जातो, घेणारा घेत जातो आणि तो कचऱ्यात फेकून देतो. हा कचरा गटारात येतो, अडकतो आणि पाणी तुंबते. यासाठी पालिकेने कडक दंड लावून परवाना रद्द केला पाहिजे. ज्या माणसाच्या हातात किंवा जवळ अशी पिशवी दिसेल त्याच्या खात्यामधून दंड वसूल करावा.
- बापू काणे, सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण
..............

कोट
शहरातील नागरिकांमध्ये प्लास्टिकबाबत जनजागृती व्हावी यासाठी शासकीय कार्यालये, नागरिक आणि विविध संस्था, विद्यार्थी यांच्यासमवेत लोकसहभागातून स्चव्छतामोहिमेचे आयोजन केले होते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याबाबत शहरात सातत्याने प्रबोधन सुरू असल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.
- आकाश लिगाडे, प्रांताधिकारी चिपळूण

-----
कोट
स्वच्छता ठेवणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. या कामी सर्वांनीच योगदान द्यायला हवे. प्रांताधिकारी, मुख्याधिकारी आणि येथील आमदार उपक्रमशील असल्याने या मोहिमेत लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. सर्वांनी स्वच्छतेची सवय लावून घेतल्यास शहर नियमित सुंदर राहण्यास मदत होईल.
- ओंकार भोजने, अभिनेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com