काशीविश्वेश्वर मंदिरात ३१ पासून हरीनाम सप्ताह
काशीविश्वेश्वर मंदिरात
३१ पासून हरीनाम सप्ताह
कणकवली ः कणकवलीतील श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखंड हरीनाम सप्ताह ३१ जुलै ते ७ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. या सप्ताहात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध मंडळांचे चित्र देखावे शहरातून निघणार आहेत.
गुरूवारी ३१ जुलै रोजी रात्री तेलीआळी मित्रमंडळाचा चित्र देखावा निघणार आहे. १ ऑगस्ट रोजी महापुरुष मित्रमंडळ, शनिवार २ ऑगस्ट पटकी देवी मित्रमंडळ, रविवार ३ ऑगस्ट ढालकाठी मित्रमंडळ, सोमवार ४ ऑगस्ट रोजी जुना मोटर स्टॅण्ड मारुती आळी मित्रमंडळ, मंगळवार ५ ऑगस्ट बिजली नगर मित्रमंडळ, बुधवार ६ ऑगस्ट आंबेआळी मित्र मंडळाचा चित्र देखावा निघेल. गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी नगर प्रदक्षिणा, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.
---
केळुसमध्ये शिबिरात
३२ जणांचे रक्तदान
वेंगुर्ले ः आकाश फिश मिल अँड फिश ऑइल प्रा. लि. कंपनीच्या वतीने केळुस येथील कंपनीच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सध्या जिल्ह्यात असणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता हे रक्तदान शिबिर कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आकाश फिश मिलचे जनरल मॅनेजर राजाराम बेदरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कंपनीचे कर्मचारी फरहान आजरेकर, सुजित केळुसकर, रमीझ शेख यांच्या हस्ते रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र व रक्त विघटन रक्त केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली भांडारे, डॉ. अभिषेक गुप्ता, अधिपरिचारिका नीता आरोलकर, समाजसेवा अधीक्षक नितीन तुरनर, रक्तपेढी तंत्रज्ञ मयुरी शिंदे, सहाय्यक ऋतुजा हरमलकर, परिचर नीतेश पाटील, परिचर प्रथमेश घाडी, नितीन गावकर आदींचे सहकार्य लाभले.
---
ओझर-कातवड रस्त्याची
संरक्षक भिंत कोसळली
मालवण ः मुसळधार पावसामुळे ओझर-कातवड रस्त्याच्या बाजूला असणारी संरक्षक भिंत कोसळल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ओझर-कातवड रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या संरक्षक भिंतीचे दगड पावसात कोसळले. या रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू असते. सध्या बागायतमार्गे जाणाऱ्या एसटी बस ओझर-कातवड मार्गे जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. या रस्त्यावर पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून वाहने चालविणे धोकादायक बनले आहे.
..................
शिवाजी स्कूलचे
शिष्यवृत्तीत यश
कुडाळ ः पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेत शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर तिठाच्या श्रावणी ज्योती, यश कुलकर्णी व श्रीकृष्ण भोई या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली. या विद्यार्थ्यांना व्ही. व्ही. सावंत, डी. डी. सामंत, पी. एम. राठोड, डी. ए. हेब्बाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष रघुनाथ गावडे, सचिव नागेंद्र परब, मुख्याध्यापक संजय गावकर, पर्यवेक्षक एम. जी. कर्पे तसेच सर्व संचालक मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
...................
काळेथरला २८ पासून
ओव्हरआर्म क्रिकेट
मालवण ः महापुरुष तारकर्ली मित्रमंडळ आयोजित ‘महापुरुष चषक २०२५’ भव्य ओव्हरआर्म रबरबॉल क्रिकेट स्पर्धा २८ जुलै ते २ ऑगस्ट या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये डोब मैदान, काळेथर येथे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रक्कम ३० हजार व चषक, उपविजेत्या संघास रोख १५ हजार व चषक तसेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी बंटी केरकर, सुकृत जोशी, हर्ष रोगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.