सदर
बोल बळीराजाचे ......... लोगो
(१८ ऑक्टोबर टुडे ३)
मार्च महिन्यातील याच लेखमालेतील आंब्याविषयीच्या एका लेखात उल्लेख केल्याप्रमाणे कृषी विद्यापीठात आयुष्य संशोधनात घालवलेले प्राध्यापक-शास्त्रज्ञ जर हापूसबाबतीत अडचणी सोडवण्याऐवजी ‘मग कोकणात हापूस लावताच कशाला?’ असा प्रश्न विचारत असतील तर ‘फेक नॅरेटिव्ह’ ची हद्दच झाली म्हणायची. शिक्षणातून मातृभूमीच्या विकासाचा ध्यास निर्माण व्हायला हवा की, तीच विकून टाकून पैसा करायचा हव्यासी दृष्टीभेद विकसित करायला हवा, हा कोकणच्या माझ्या बळीराजाच्या भविष्याचा मुलभूत प्रश्न आहे.
-rat24p18.jpg-
25O00188
--जयंत फडके
जांभूळआड, पूर्णगड रत्नागिरी
----
कोकणातील शेतीत काही
मिळत नाही हे फेक नॅरेटिव्ह
गेली काही वर्ष एका सूत्रबद्ध षडयंत्राला माझा बळीराजा बळी पडतोय, ते म्हणजे फेक नॅरेटिव्ह. कोकणातील शेतीत काही मिळत नाही, हा तो ‘फेक नॅरेटिव्ह..!’ या सगळ्याची हद्द झाली जेव्हा राष्ट्रीय मूल्य आयोगाचे सदस्य कोकणातील शेती कशी तोट्यात आहे, हे पटवून देऊ लागले तेव्हा. बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या भरात त्यांनी कोकणातील भातशेती, नाचणी, इतर कडधान्यं इतकंच काय कोकणची ओळख असलेली नारळ, सुपारी, काजू, आंबा ही फळपिकेही कशी तोट्यात आहेत, हे अगदी पटवून दिलं. आकडेवारी तोंडावर मारली आणि आयुष्य याच शेतीत घालवणाऱ्या माझ्या बळीराजाला अगदीच दारिद्र्यरेषेखाली अजून काही असलं तर तिथं नेऊन पोचवलं. माझा भाबडा बळीराजा या ओघवत्या पटवून देण्याच्या सल्ल्याने अगदी हलला, द्विग्मूढ झाला; पण हे काही आजचं नाही. प्रसारमाध्यमांतून कोकणातील निसर्ग, स्वच्छ समुद्रकिनारे, हवा, कोकणातील खाद्यसंस्कृती याची भुरळ जगाला पडली. याची दुसरी बाजू अशी की, धनदांडग्यांचं लक्ष या सोन्याची अंडी देणाऱ्या नव्हे तर सोन्याच्याच कोंबडीवर पडलं. मग कोकणातील दारिद्र्य, उपासमारी, बेकारी, शून्य विकास याचं रंजित चित्र कोकणातील युवापिढीच्या बुद्धीवर वारंवार आदळेल, असं नियोजन सुरू झालं. या उलट शहरातल्या संधी, झगमगाटात भविष्याचं मृगजळ रंगवून समोर आणलं गेलं. हे एक प्रकारचं ‘स्लो पॉयझनिंग’च होतं. दुसरीकडे मोठमोठ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांच्या बातम्या कोकणात धडकू लागल्या. या प्रकल्पात ज्याच्या जागा जाणार होत्या त्यांना कल्पनातीत पैशांची लालूच दाखवली गेली. माझ्या बळीराजाने ही कोटीच्या कोटी उड्डाणे गेली दहा-पंधरा वर्षे पचवली. खाऊनपिऊन सुखी बळीराजा या वावटळीत विस्कटत गेला.
पुढच्या पिढीत शिक्षण ही एक अजून अस्वस्थ करणारी गोष्ट ठरत्येयं. या शिक्षणाचं ध्येयच मुळी पैसा जमवणारी मशिन बनवण्याचं आहे. कोकणातील निसर्गसंपन्नतेचा उपयोग करून घेऊन इथे उद्योग व्यवसाय उभे राहावे, असं काही या व्यवस्थेत अपेक्षितच नाही. शेती ही आपली जीवनपद्धती आहे, याचा तर पूर्ण विसर पडलाय. पर्यटन, फळप्रक्रिया, आधुनिक शेती, पाणी व्यवस्थापन याबाबत काही दृष्टिकोनच नाही. मग बळीराजाची पुढची पिढी कोकणात थांबणार कशी? रेल्वे, एक्स्प्रेस हायवे आणि आता हवाई वाहतूक हे कोकणातून शहरात लोंढे वाहून नेणारी सुलभ साधने झाली. खरंच, कोकण रेल्वेचा कोकणच्या उद्योग व्यवसायात सहभाग वाढावा असे प्रयत्न झाले? यामागे हे ‘फेक नॅरेटिव्ह’ तर काम करत नाही?
या देशात आपल्या शिक्षणाला किंमत नाही, असं मानून विदेशात गेलेले आता लाथाडले जाताना आपण पाहतो आहोत. ते जात्यात असले तर बळीराजाची पुढची सुशिक्षित म्हणवणारी पिढी सुपात आहे. युरोप, अमेरिका आणि साऱ्या जगात आपल्या मातृभूमीबद्दल टोकाचा झालेला दृष्टिकोनात्मक बदल दुर्लक्षित करून चालणार नाही. वैज्ञानिक प्रगतीनं जग जवळ आलं, असं म्हणणं किती फोलपणाचं आहे हेही स्वच्छ होत आहे. मग हीच वेळ आहे कोकणातील माझ्या बळीराजाच्या पुढच्या पिढीनं झगमगाटात हरवून न जाता आपलं स्वत्व जपण्याची. अजूनही वेळ गेलेली नाही. शेती, शेतीपूरक उद्योग, मत्स्यशेती, पर्यटन, मधुमक्षिका पालन, रेशीम शेती, फूलशेती असे अनंत पर्याय उपलब्ध आहेत. बदलणाऱ्या वातावरणाची चिंता फक्त कोकणातील शेतकऱ्यांचेच दुःख नाही. मजूर समस्या, आर्थिक गणित यासारखे प्रश्न कालही होते, पुढेही राहतील. प्रश्न आहे तिथे उत्तरही असते. फक्त ते सोडवण्याचा दृष्टिकोन व्यवस्थेत यायला हवा, आणायला हवा. यांत्रिकीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवस्थात्मक शिक्षणात कोकणातील शेतीचा अंतर्भाव वाढायला हवा. दिशा स्पष्ट असली तर धावण्यात उद्दिष्ट गाठण्याचा टप्पा नक्कीच असतो, त्या दृष्टीने प्रयत्नही होतात. भावनेच्या, विकासाच्या, राजकारणाच्या, धार्मिक-बौद्धिक झगमगाटाच्या काळात सशानं किंवा कासवानं आपली दिशा नक्की करायला हवी. शेवटी लवकर पोचण्यापेक्षा योग्य ठिकाणी पोचतोय ना..हेही ठरवायला हवं..!!
(लेखक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

