दापोली- सलग चौथ्या दिवशीही जिल्ह्यात पाऊस

दापोली- सलग चौथ्या दिवशीही जिल्ह्यात पाऊस

Published on

पान १
००८५७

००८२३
००८२४

जिल्ह्यात ६३ हेक्टर भातशेती ‘पाण्यात’
सलग चौथ्या दिवशीही पाऊस : वेगवान वाऱ्यामुळे मासेमारी नौकांनी टाकला नांगर
सकाळ वृत्तसेवा
दापोली / रत्नागिरी, ता. २७ : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सलग चौथ्या दिवशीही रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्याचा फटका भातशेतीला बसला असून, सोमवारी सकाळी कापून ठेवलेले भात पावसात पूर्णपणे भिजून गेले. अचानक पडणाऱ्या पावसामुळे ४३५ शेतकऱ्यांचे ६३ हेक्टरवरील शेतीचे ५ लाख ९९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. समुद्र खवळल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिल्यामुळे ६०० नौका आंजर्ले खाडीत सुरक्षित उभ्या करून ठेवल्या आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर ताशी ३५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे आणि अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
गेले चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाने भातशेतीसह पर्यटन आणि मच्छीमारीवर परिणाम झाला आहे. आज सकाळी कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे अनेकांनी भातकापणीला सुरवात केली; मात्र दुपारी अचानक जोरदार पावसाला सुररुवात झाली. त्यामुळे रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तयार भातशेती पावसामुळे वेळीच कापू शकत नसल्याने जमीनदोस्त झाली आहे. कापून ठेवलेले भात भिजल्याने जनावरांच्या वैरणीचा तुटवडा जाणवणार आहे. जिल्ह्यात अजूनही सुमारे २० टक्के क्षेत्रावरील भातकापणी शिल्लक आहे. त्यात पावसाचा व्यत्यय येत असल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
समुद्रकिनारी भागात वेगवान वारे वाहत असल्यामुळे दापोली तालुक्यातील हर्णै, मुरूड, दाभोळ, बुरोंडी, केळशी या किनारपट्टीवरील सहाशेंहून अधिक मासेमारी नौका सुरक्षित ठिकाणी उभ्या करून ठेवल्या आहेत, तर रत्नागिरीतील मिरकरवाडा, जयगड बंदरातही पाचशेंहून अधिक नौका थांबलेल्या आहेत. वादळी वारे आणि उंच लाटा उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन तटरक्षक दल, हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाने मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या मासळीची आवक कमी झाली असून, स्थानिक बाजारपेठांमध्ये ताज्या मासळीची टंचाई असल्याने दर वधारले आहेत.

पर्यटकांना फटका
दरम्यान, दिवाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील विविध पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत; मात्र वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने पर्यटकांची निराशा झाली आहे. काही पर्यटकांनी माघारी फिरणेही पसंत केले. त्याचा फटका काही व्यावसायिकांना बसला आहे.

कोट १
गेल्या दोन दिवसांपासून समुद्रावर वारे जोरात आणि लाटा उंच उसळत आहेत. पावसाचे प्रमाण जास्त आहे. अशा वेळी समुद्रात जाणे म्हणजे जीवावर बेतू शकते. आम्ही बोटी बंदरातच ठेवून सुरक्षिततेचा निर्णय घेतला आहे; मात्र मासेमारी बंद राहिल्याने रोजीरोटीवर परिणाम होतो आहे. घर खर्च भागविणे कठीण झाले आहे.
- अनंत चोगले, मच्छीमार

चौकट
* पावसामुळे भातशेतीचे झालेले नुकसान तालुकानिहाय असे :
तालुका बाधित क्षेत्र (हेक्टरी)
* मंडणगड ८.५०
* दापोली ९.३१
* खेड ६.५०
* चिपळूण ९.२०
* गुहागर ६.१५
* संगमेश्वर ९.६०
* रत्नागिरी २.४०
* लांजा ५.८४
* राजापूर ६.१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com