नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेत जोरदार चुरस

नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेत जोरदार चुरस

Published on

नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेत जोरदार चुरस
पालकमंत्र्यांची कसरत; महाविकास आघाडीकडूनही तयारी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : रत्नागिरी पालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे. सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्यामुळे शिवसेनेत इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांना उमेदवार निवडीसाठी कसरत करावी लागणार आहे; परंतु अंतर्गत वाद विकोपाला गेल्यास आयत्यावेळी नवीन नाव पुढे येण्याची शक्यता आहे. महायुती निश्चित असली तरीही भाजपकडूनही तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीकडून माजी आमदार बाळ माने यांच्या सूनबाईंचे नाव चर्चेत आहे.
रत्नागिरी पालिकेवर अनेक वर्षे सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेच्या दिग्गजांचा थेट नगराध्यक्ष पदावर डोळा होता; परंतु सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आणि सर्वांचे मनसुबे धुळीत मिळाले. त्यामुळे आता शिवसेनेतील ज्येष्ठ नगरसेविकांना थेट नगराध्यक्ष पदाची लॉटरी लागली आहे. शिंदे शिवसेनेत सर्वांत जास्त इच्छुक महिला आहेत. ज्येष्ठ नगरसेविका स्मितल पावसकर या सहावेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यांनी विविध विकासकामे करून आपला मतदार संघ चांगला बांधलेला आहे तर दोनवेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या शिल्पा सुर्वेही चर्चेत आहेत तसेच वैभवी खेडेकर यांच्यासह सुदेश मयेकर यांच्या पत्नीचेही नाव रेसमध्ये आहे. इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पालकमंत्री सामंत यांच्यापुढे उमेदवार निवडीचे मोठे आव्हान राहणार आहे. महायुतीतील घटक पक्ष भाजपकडूनही नगराध्यक्ष पदावर दावा केला आहे. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी उघडउघड यावर भाष्य केले आहे; परंतु सर्वांत जास्त जागा असल्यामुळे नगराध्यक्ष पद शिवसेनेकडेच जाणार, हे निश्चित मानले जात आहे.
रत्नागिरीत शिंदे शिवसेना विरूद्ध महाविकास आघाडी यांच्यात चुरस निश्चित आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेसची मोट बांधून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे. बाळ माने यांची सूनबाई महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी रेसमध्ये आहे तसेच राष्ट्रवादीकडून मिलिंद कीर यांच्या पत्नीचेही नाव पुढे केले जात आहे. गेल्या काही दिवसात रत्नागिरी शहरातील विकासकामांवरून ठाकरे सेनेचे उपनेते बाळ माने यांनी आवाज उठवत पालकमंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केले. त्यानंतर दिवाळीत ठाकरे शिवसेना विरुद्ध शिंदे शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरस होईल, हे निश्चित झाले आहे.
---------
कोट
शिवसेना पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी चार ते पाच महिला इच्छुक आहेत. त्यांच्या जनाधाराबाबत पक्षाकडून सर्व्हे सुरू आहे. त्याचा अहवाल वरिष्ठांकडे जाईल. त्यानंतर पक्ष जो उमेदवार देईल त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची राहील.
- बिपिन बंदरकर, शहरप्रमुख शिवसेना, रत्नागिरी शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com