चक्रीवादाळाने हापूस कलमं ''शॉक'' मध्ये जाण्याची भिती
rat2p17.jpg
01993
रत्नागिरीः पालवी फुटण्याच्या स्थितीत असलेले हापूसचे झाड.
----------
पावसाने हापूसच्या उत्पादनावर परिणाम
हंगामही उशीराने; वातावरणीय बदलामुळे झाडाच्या आंतरिक रचनेत बदल
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. २ः नुकत्याच झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्याचा थेट परिणाम आंबा, काजू या पिकांवर होणार आहे. मोहोर येण्याच्या टप्प्यावर असतानाच अचानक झालेल्या वातावरणीय बदलामुळे हापूस कलमं शॉक (धक्का) मध्ये जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम उत्पादनावर होईल आणि हंगामही एक महिना उशीराने सुरू होणार आहे.
रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा घोषित झाल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आंबा, काजू या फळपिकांचे लागवड क्षेत्र मोठ्याप्रमाणात वाढले आहे. त्यामुळे बागायतदार त्याची उत्तमप्रकारे निगा राखत असतो. परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या सुरवातीपासून वातावरणीय बदलाचा परिणाम झाला आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरीस पाऊस थांबतो व ऑक्टोबरमध्ये उष्मा व थंडी जाणवू लागते. याचवेळी झाडांना नवीन येणाऱ्या पालवीचीही प्रक्रिया पूर्ण होऊन मोहोर (तुरा) येण्याची प्रक्रिया सुरू होते. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारी व पोषक वातावरण असणाऱ्या भागातील बागांमध्ये ही प्रक्रिया सुरूही झाली होती. मात्र गेले आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने आंबा बागांमधील झाडांच्या बुंध्यांना पाणी मिळाल्याने त्यांनी पुन्हा जमिनीतील पोषकरस घेण्याची प्रक्रिया सुरू केली.
अचानक झालेल्या वातावरणीय बदलाने झाडांना शॉक (धक्का) बसल्यामुळे झाडांच्या आंतरिक रचनेमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे पुढील सर्व प्रकिया विस्कळित होणार आहेत. हापूस कलमांना पहिली आलेली पालवी ही जून होण्याच्या अपूर्ण अवस्थेत असताना नवीन पालवी आली आहे. परिणामी फक्त झाडांची शाखीय वाढ होत आहे आणि पर्यायाने त्या झाडाला सशक्त मोहोर येणार नाही. तसेच त्यातील फळधारणेसाठी परिपक्वतेचे प्रमाणही कमी होईल. याशिवाय ढगाळ, पावसाळी वातावरणाने हवेमध्ये दमटपणा वाढून बुरशीजन्य आजारांचाही प्रार्दुभाव सुरू झाला आहे.
दरम्यान, काजू झाडांनाही नोव्हेंबरमध्ये मोहोराची प्रक्रिया सुरू होते, पण तोही या परिस्थितीत काळा पडत आहे. यावर्षीच्या अतिपावसामुळे काजुच्या झाडांची पानगळ झाल्याने त्यांना नवीन पालवीही येत आहे. त्यामुळे या वातावरणीय बदलांमुळे आंब्याबरोबरच काजू या प्रमुख पिकांचा हंगाम लांबणीवर पडणार आहे.
कोट
वातावरणातील बदलांचा परिणाम टाळण्यासाठी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून झाडाच्या सावलीखालील जागा स्वच्छ करा जेणेकरून जमिनीतील ओलावा दूर होईल. ट्रायकोडर्मा व मेटारायझीअम सारख्या मित्र बुरशींचा वापर जमिनीतून व झाडावरदेखील फवारणीच्या माध्यमातून केला पाहिजे. जेणेकरून जमिनीतून हानिकारक बुरशीचा बंदोबस्त होईल. तसेच वाळवी, खोडकिडा, थ्रीप्स, तुडतुडा तसेच हुमणी यांची अंडी पिल्ले किंवा कोष अवस्था नष्ट करता येतील. त्यामुळे शेतकरांच्या पुढील अनेक फवारण्या वाचून उत्पादन खर्च कमी करणे शक्य आहे. बाग स्वच्छ व पाणी त्वरित बाहेर घालवणे आणि बागेत जास्तीत जास्त सूर्यप्रकाश येण्यासाठीचे नियोजन करणे क्रमप्राप्त आहे. सोबतच सेंद्रीय पद्धतीने झाडांची निगा राखण्याची गरज आहे.
- संदीप कांबळे, सदस्य, सेंद्रिय शेती धोरण तसेच महाराष्ट्र प्रामाणिकरण समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

