रिकाम्या होड्या, उपजीविकेचा प्रश्‍न

रिकाम्या होड्या, उपजीविकेचा प्रश्‍न

Published on

02015

रिकाम्या होड्या, उपजीविकेचा प्रश्‍न

शासनाने मदत द्यावी; निसर्गाचा कोप सहन करत मच्छीमारांचे आवाहन


सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ : परतीचा लांबलेला पाऊस, समुद्री वादळे यामुळे ठप्प झालेल्या किनारपट्टीवरील मासेमारीमुळे तालुक्यातील मच्छीमार हैराण आहेत. निसर्गापुढे मच्छीमार हतबल झाल्यामुळे शासनाकडून आर्थिक मदतीचा हात देण्याची मागणी आता होऊ लागली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या तालुक्यातील मच्छीमारांनी एकत्र बैठकीत चर्चा करून आपले गाऱ्हाणे शासन दरबारी मांडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मच्छीमार जगला पाहिजे, यासाठी शासनाने आर्थिक मदतीचा हात देऊन मत्स्य दुष्काळ जाहीर करावा आणि मच्छीमारांची कर्जमाफी करावी, अशी मागणी केली.
तालुक्याच्या किनारी भागात गेले सुमारे पंधरा दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच समुद्रातील वातावरण वादळी वाऱ्यामुळे खराब झाल्याने स्थानिक मच्छीमारी ठप्प झाली आहे. त्यामुळे गेले काही दिवस मच्छीमारी हंगाम समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. यामुळे हतबल झालेल्या तालुक्यातील विविध भागांतील मच्छीमारांनी आज एकत्र येत बैठक घेतली. बैठकीमध्ये शासन दरबारी मच्छीमारांची कैफियत मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. मत्यदुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. मच्छीमारांच्या मते, मागील तीन वर्षांचा विचार केल्यास सातत्याने होणारे वादळी हवामान, प्रकाश क्षेत्रातील मासेमारी, परप्रांतीय नौकांची मासेमारी यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. चालू हंगामाचे तीन महिने झाले. मात्र, सातत्याने पडणारा पाऊस, वादळसदृश परिस्थितीने समुद्राची बदलेली परिस्थिती यामुळे मासेमारी व्यवसाय करणे कठीण झाले आहे. मासेमारी हंगाम दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करताना दिसत आहे. राज्य शासनाने मत्स्यशेती म्हणून मासेमारी व्यवसायाला संरक्षित केले आहे. मासेमारी व्यवसायही शेतकऱ्यांप्रमाणे अवर्षणाचा लढा लढत आहे. म्हणूनच शासनाकडे मत्स्यदुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आहे. मच्छीमार जगविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने आर्थिक पाठबळ द्यावे व मच्छीमारांचे कर्ज माफ करावे. या व्यवसायावर अवलंबून असलेले नौकामालक, पातमालक, मच्छीमार, मासळी विक्रेते, मासे खारविणारे, वाहतूक व्यावसायिक, रापणसंघ व इतर पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक पाठबळ मिळावे, जेणेकरून मच्छीमार उभा राहू शकेल.
.........................
...अन्यथा रस्त्यावर उतरू
सातत्याने होत असलेल्या हवामान बदलामुळे मच्छीमारी हंगाम समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. परतीचा पाऊस, वादळी वारे यामुळे मच्छीमारी ठप्प आहे. शासनाने मत्स्य दुष्काळ जाहीर करावा, शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मच्छीमारांची यातून सुटका करावी. शासनाचा याबाबतीत काही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास भविष्यात मच्छीमार रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पहाणार नाहीत, असा सज्जड इशारा मच्छीमारांनी दिला.
................
कोट
व्यवसाय अडचणीत असल्याने मच्छीमार कर्जबाजारी झाला आहे. मात्र, दर्यावर्दी मच्छीमार कितीही आर्थिक संकटात सापडला तरी तो आत्महत्या करीत नाही. मच्छीमारांची सातत्याने मत्स्य दुष्काळाशी लढाई सुरू आहे. याबाबत येत्या काही दिवसांत तहसीलदार, पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय विभागाला लेखी निवेदन देणार आहोत. कोकणातील सुमारे ९९ टक्के लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचे घटक असल्याने त्यांच्या माध्यमातून मच्छीमारांचे प्रश्न सुटावेत, ही आग्रही मागणी आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे मत्स्य व्यवसाय खाते असल्यामुळे त्यांची भेट घेऊन, समस्या मांडून, न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करू.
- मच्छीमार, देवगड तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com