गणपतीपुळेत खराब रस्ते, जीवघेणी वाहतूक कोंडी

गणपतीपुळेत खराब रस्ते, जीवघेणी वाहतूक कोंडी

Published on

rat2p18.jpg
01994
गणपतीपुळेः येथील किनाऱ्यावर झालेली गर्दी.
----------
गणपतीपुळेत खराब रस्ते,
जीवघेणी वाहतूक कोंडी
स्थानिकांना त्रास; कायमस्वरूपी उपायांसाठी निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील खराब रस्ते आणि जीवघेणी वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाहून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी भगवतीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव घाग यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या काही दिवसात गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात पर्यटक दाखल होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा दिवाळी सुट्टीत चार लाखाहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावल्याचे गणपती मंदिरातील नोंदीवरून लक्षात येत आहे. त्यातही मुसळधार पाऊस असतानाही पर्यटकांचा ओढा कमी झालेला नव्हता. रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांना भेटी देऊन अनेक पर्यटक गणपतीपुळे येथे मुक्कामासाठी आले होते. त्यामुळे मागील पंधरा दिवस गणपतीपुळे गजबजलेले आहे. क्षमतेपेक्षा अधिक पर्यटक दाखल झाल्यामुळे त्याचा फटका स्थानिकांना मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. याबाबत घाग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर उपाय करा अशी मागणी केली आहे.
जयगडपासून ते गणपतीपुळ्यापर्यंत दहा गावांना रत्नागिरीकडे जाण्यासाठी गणपतीपुळे येथूनच पुढे जावे लागते. या मार्गावर आपटातिठा येथे येणाऱ्या भाविकांकडून अभ्यागत कर वसूल केला जातो. त्यासाठी थांबलेल्या वाहनांची सुट्टीच्या दिवसात इतकी गर्दी होते की, तासंतास तेथे वाहने अडकून पडतात. तसेच फुटलेली गटारे, अरुंद आणि खोदलेले रस्ते, त्यातून वाहणारी गटारे या सर्वामुळे पर्यटकांबरोबर येथून पुढे जाणाऱ्या सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. तिथे होणाऱ्या वाहतूक कोंडीत एखादी रुग्णवाहिका अडकली तर एखाद्याचा उपचाराविना जीव जाऊ शकतो. याकडे प्रशासनाने गांभिर्याना पाहून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस नियुक्त केलेले असतात. परंतु काहीवेळा त्यांनाही मर्यादा येतात. वाहने अधिक असल्याने त्यामधून मार्ग मोकळा करणे अशक्य होते. अशावेळी वाहने तासनतास उभी राहतात. त्यासाठी येथील रस्ते रूंद करणे गरजेचे आहे.

चौकट
पर्यटन निवास परवानगी सुलभ करा
गणपतीपुळेसह आजुबाजूच्या गावांमध्ये सध्या पर्यटक निवासाची सुविधा आहे. पर्यटक निवास म्हणजे होमस्टेच्या परवानग्या. त्या सहज आणि सुलभ मिळाल्या तर स्थानिकांना रोजगाराचे मोठे साधन निर्माण होईल. तसेच ग्रामपंचायतीमधील राजकारणात कोणत्याही प्रकारच्या परवानग्या अडकू नयेत. तसेच एमटीडीसीकडूनही होम स्टेला परवानगी देताना योग्य ती काळजी घ्यावी, अशी सूचनाही घाग यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com