शंभर उद्योजक आणू; परवानगी द्याल?
शंभर उद्योजक आणू; परवानगी द्याल?
पराग गावकर, प्रवीण गावकर; उद्योगमंत्र्यांना खुले आव्हान
सकाळ वृत्तसेवा
कळणे, ता. २ ः आम्ही शंभर उद्योजक आडाळीत आणतो; तुम्ही त्यांना केवळ शंभर दिवसांत भूखंड ताबा आणि उद्योग उभारणीच्या परवानग्या देऊ शकता का? असे खुले आव्हान आडाळी औद्योगिक क्षेत्र कृती समितीचे अध्यक्ष तथा सरपंच पराग गावकर आणि सचिव प्रवीण गावकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिले.
श्री. गावकर म्हणाले, ‘‘अलीकडेच उद्योगमंत्री सामंत यांनी आडाळीतील औद्योगिक क्षेत्रात उद्योग येत नाहीत, त्यामुळे जागा गोल्फ व हॉटेल प्रकल्पासाठी देण्यात येईल, अशी घोषणा सावंतवाडीत केली होती. या घोषणेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. कृती समितीने यापूर्वीच संशय व्यक्त केला होता की, महामंडळ प्रशासनाने गोल्फ प्रकल्पासाठी जागा राखून ठेवत भूखंड वाटप प्रक्रिया स्थगित केली आहे. सामंत यांच्या घोषणेमुळे तो संशय आता खरा ठरला आहे. आम्ही दहा वर्षांपूर्वी आमच्या जमिनी औद्योगिक विकासासाठी दिल्या. गेली तीन वर्षे शेकडो उद्योजक आडाळीत येऊन गेले. मात्र, महामंडळ प्रशासनाचे असहकार्य आणि लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे आजपर्यंत एकही उद्योग उभा राहिला नाही. आज मात्र विकसित केलेल्या जमिनी एका रिअल इस्टेट कंपनीच्या घशात घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न सहन करणार नाही. प्रसंगी न्यायालयीन लढाई लढू. रिसॉर्ट, हॉटेल्स आणि गोल्फ कोर्स उभारून स्थानिकांना वॉचमन, ड्रायव्हर किंवा हेल्परचा रोजगार देण्याची मानसिकता खपवून घेणार नाही. आम्ही विकासाच्या बाजूने आहोत, पण त्यातून स्थानिक युवकांना तांत्रिक आणि स्थिर रोजगार मिळायला हवा. आज किमान ८०० रोजगार निर्माण करू शकतील एवढे उद्योग आडाळीत तयार आहेत. मात्र, परवानग्या आणि भूखंड हस्तांतरण प्रक्रिया दोन वर्षांपासून ठप्प आहे. कृती समितीकडे असलेल्या कागदपत्रांनुसार सुमारे ५० उद्योजकांनी आडाळीत भूखंड घेतले असून, उद्योग उभारणीची प्रतीक्षा सुरू आहे. परंतु, महामंडळाकडून परवानग्या नाकारल्या जात आहेत. शेकडो उद्योजक आजही येथे यायला तयार आहेत. आम्ही ‘ग्रीन कॅटेगरी’तील उद्योजकांना उद्योगमंत्र्यांसमोर आणण्यास तयार आहोत. शंभर दिवसांची विशेष विंडो उघडा; आम्ही शंभर उद्योजक आणू.’’
-------------
२५ इच्छुकांची यादी देऊ
राज्यात ग्रीन कॅटेगरीचे उद्योग नाहीत का? पर्यटन जिल्हा असल्यामुळे उद्योग येत नाहीत, असे सांगणाऱ्या सामंत यांनी व्हाईट, ग्रीन आणि ऑरेंज कॅटेगरीतील किती उद्योजकांना आडाळीचा पर्याय दिला, याची यादी जाहीर करावी. नसेल तर आम्ही किमान २५ इच्छुक उद्योजकांची यादी देऊ शकतो. ‘आयुष’ प्रकल्पाला जागा देऊन चार वर्षे झाली, त्याचा आजवर मागमूसही नाही. मागील निवडणुकीत चार दिवसांत उद्योग पायाभरणी होईल, असे सांगितले. मात्र, उलट उद्योगांना परवानगीच रोखली गेली. उद्योग उभारणी ही केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक जबाबदारी आहे. एका गोल्फ कोर्समधून काही वॉचमन व ड्रायव्हर मिळतील. मात्र, शेकडो लघुउद्योगांमधून हजारो तरुणांना रोजगार मिळेल.
उद्योग आणता येत नसतील, तरी किमान आलेल्या उद्योजकांना परवानग्या द्या, असे आवाहन गावकर यांनी उद्योगमंत्र्यांना केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

