सावंतवाडीत २८ डिसेंबरला ''सिंधू यंग चॅम्पियन रन''

सावंतवाडीत २८ डिसेंबरला ''सिंधू यंग चॅम्पियन रन''

Published on

सावंतवाडीत २८ डिसेंबरला
‘सिंधू यंग चॅम्पियन रन’
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः भावी पिढीतील क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी येथे ‘सिंधू रनर्स’ तर्फे २८ डिसेंबरला ‘सिंधू यंग चॅम्पियन्स रन २०२५’ चे आयोजन केले आहे. याचे हे दुसरे पर्व असून, यात सहभागाचे आवाहन आयोजकांतर्फे डॉ. स्नेहल गोवेकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात मॅरेथॉन स्पर्धा भरवण्याचे प्रमाण इतर भागाच्या तुलनेत कमी आहे. येथील मुलांमध्ये असलेली उर्जा प्रवाहित व्हावी आणि समृध्द आरोग्य व सामाजिक एकतेचा संस्कार या नव्या पिढीत रुजावा, यासाठी ‘सिंधू यंग चॅम्पियन्स रन’ चे आयोजन केले आहे. याआधी आयोजित उपक्रमामधून जिल्ह्यात काही उद्योन्मुख खेळाडूंनी राज्यस्तरावरच्या विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. हीच चळवळ पुढे नेण्याच्या हेतूने पुन्हा एकदा जिल्हा मर्यादित स्पर्धेचे आयोजन केले आहे.
वयोगट आणि क्षमतेनुसार या स्पर्धेची रचना असेल. सात ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी दीड किलोमीटर, दहा ते तेरा वर्षांपर्यंत तीन किलोमीटर, तेरा ते सोळा वर्षांपर्यंत पाच किलोमीटर आणि सोळा ते एकोणीस या गटासाठी दहा किलोमीटर धावण्याच्या प्रकारात भाग घेता येईल. यात सहभागी झालेल्यांना टीशर्ट, मेडल, पोस्ट इव्हेंट स्नॅक, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ही स्पर्धा सावंतवाडी राजवाडा येथून २८ डिसेंबरला सकाळी सुरू होणार आहे. यात सहभागासाठी डॉ. स्नेहल गोवेकर, भूषण बांदेकर किंवा ओंकार पराडकर यांच्याशी २५ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन सिंधू रनर्सतर्फे केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com