रत्नागिरी-शालेय सहलींसाठी ''लालपरी'' बंधनकारक
शालेय सहलींसाठी ‘लालपरी’ बंधनकारक
खासगी बसला बंदी, वॉटरपार्क, रिसॉर्ट, बागबगीचांना आता मुरड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : शाळांच्या सहलींवर आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानुसार, शाळा जर खासगी स्कूलबस किंवा प्रवासी बस वापरून सहली काढतात तर थेट कारवाई केली जाईल. या आदेशाची अंमलबजावणी सहाय्यक परिवहन आयुक्त यांनी सर्व प्रादेशिक अधिकाऱ्यांना कळवली आहे. तसेच वॉटरपार्क, रिसॉर्ट, बागबगीचेऐवजी आता सहली ऐतिहासिक स्थळांकडे नेण्याचे आदेश जारी केले आहेत.
यापुढे शाळांना सहलीसाठी केवळ सरकारी एसटी म्हणजे लालपरी बस वापरणे बंधनकारक होणार आहे. तसेच, ऐतिहासिक स्थळांना सहली नेण्याचे आदेश आणि सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे. सहाय्यक परिवहन आयुक्त यांनी आदेश दिले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर काटेकोर कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. शालेय सहली फक्त मनोरंजनासाठी नाही तर विद्यार्थ्यांना संस्कृती, इतिहास, भूगोल आणि प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी महत्वाची आहेत.
पूर्वी शाळा सहलींसाठी वॉटरपार्क, रिसॉर्ट, बागबगिचे यांसारख्या ठिकाणांना प्राधान्य देत होत्या. आता शिक्षण विभागाने सहली ऐतिहासिक स्थळांकडे नेण्याचे आदेश जारी केले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक आणि सांस्कृतिक ज्ञान मिळेल. शाळांनी सहलीसाठी एसटी बसलाच प्राधान्य द्यावे, हा नियम स्पष्ट आहे. नव्या आदेशानुसार, अशा प्रथा आढळल्यास थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे शाळांकडे लालपरीचाच पर्याय उरणार आहे.
चौकट
...असे आहेत नियम
शाळांनी सहलीसाठी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी. प्रत्येक 50 विद्यार्थ्यांसोबत पाच शिक्षक असावेत, विद्यार्थिनी असल्यास महिला शिक्षिका उपस्थित असणे आवश्यक आहे. सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच सहल आयोजित करावी.
चौकट
एसटीपुढे आव्हान
सरकारी एसटीला आता दोन आव्हाने समोर आहेत. शाळांना मोठ्या प्रमाणात बस उपलब्ध करून देणे आणि दररोज सामान्य प्रवाशांसाठी बसेसची उपलब्धता निश्चित करणे. विद्यार्थ्यांच्या सहलींच्या हंगामात आधीच काही ठिकाणी डेपोमध्ये बस मिळण्यास अडचणी येत आहेत. खासगी बस बंदीमुळे एसटीवरचा भार आणखी वाढणार आहे.
चौकट...
एसटी बसेसमुळे मिळणारे फायदे
* कोणत्याही भागात सुरक्षित प्रवासाची हमी
* सहलीसाठी कमी खर्चात बस उपलब्ध
* विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सरकारी स्तरावर हमी
* शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी परवडणारा आणि सुरक्षित प्रवास
---------
एसटी बसमुळे होणारा तोटा
▪️ बस वेळेवर उपलब्ध न होण्याची समस्या
▪️ जुनी बस असल्यास प्रवासात त्रास
▪️ खासगी बसइतकी सुविधा किंवा आराम नसणे
▪️ सामान्य प्रवाशांसाठी सेवेत मर्यादा
---
कोट
शाळांच्या सहलींसाठी एसटीची लालपरी वापरावी, हे शासनाने धोरण निश्चित केले आहे. सुरक्षित प्रवासाच्यादृष्टीने शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजवणी सुरू झाली आहे.
-प्रज्ञेश बोरसे, एसटी विभाग नियंत्रक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

