
१ रुपयात मिळणार १० सॅनिटरी नॅपकिन
एक रुपयात मिळणार १० सॅनिटरी नॅपकिन
---
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ; बीपीएल व बचत गटाच्या महिलांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : मासिक पाळी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून दारिद्र्यरेषेखालील व बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयात १० सॅनिटरी नॅपकिन देण्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. या योजनेसाठी २०० कोटी रुपये खर्च येणार असून, त्याचा राज्यातील ६० लाख महिलांना फायदा होणार आहे. ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, की मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व जागतिक प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीदरम्यान योग्य काळजी न घेतल्याने जगभरातील सुमारे आठ लाख महिलांचा मृत्यू झाला. त्यामुळेच राज्य सरकारने दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी नाममात्र किमतीत नॅपकिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या राज्यातील ग्रामीण भागातील बचत गट व आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेतही सॅनिटरी नॅपकिन देण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी वगळून दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी तसेच बचत गटातील महिलांसाठी ही योजना राबवली जाईल. गाव स्तरावरच बचतगटाकडून ही सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी केली जातील. जिथे हे शक्य नाही, तिथे दर करार करून खरेदी केली जाईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गाव स्तरावर मशिन बसविण्यात येणार आहे. या मशिन जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच शासकीय निधी व सीएसआर निधीतून बसविण्यात येतील. ही योजना राबविण्यासाठी खूप अभ्यास झाल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
.
चौकट
अशी असेल योजना
६० लाख लाभार्थी
१ रुपयात मिळणार १० नॅपकिन
योजनेवर २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित
बचत गटाकडून करणार उत्पादन
आशा सेविका, उपकेंद्राकडून पुरवठा
सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट व्यवस्था
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09950 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..