
CSMT वरील फलाटांचे विस्तारीकरण, एका गाडीतून 5,000 प्रवाशांचा फायदा
मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, दादर, एलटीटी येथे दररोज शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्यांची ये-जा सुरू असते. त्यातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात; मात्र आता प्रवाशांची संख्या वाढत असल्याने एक्स्प्रेसच्या डब्यांचीही संख्या वाढवण्यात येत आहे; परंतु सीएसएमटी येथील काही फलाटांची लांबी कमी असल्याने २४ डब्यांची एक्स्प्रेस उभी करता येत नाही. त्यामुळे आता मध्य रेल्वे सीएसएमटीवर २४ डब्यांची एक्स्प्रेस उभी राहण्यासाठी फलाटांची लांबी वाढवणार आहे. २४ डब्यांच्या रेल्वेसाठी केवळ पाच फलाट उपलब्ध असल्याने आता फलाट क्रमांक १० ते १३ क्रमांकाच्या फलाटाचे विस्तारीकरण करण्याचा रेल्वेचा मानस आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी आणि एलटीटी ही दोन महत्त्वाची टर्मिनस आहेत. सीएसएमटी स्थानकातून लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक होते, तर एलटीटी येथून केवळ लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. एलटीटी येथून दररोज लांब पल्ल्याच्या ११८, तर सीएसएमटी येथून १०० गाड्या धावतात. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १०, ११ वरून १३ डब्यांच्या, तर फलाट क्रमांक १२ आणि १३ वरून १७ डब्यांच्या गाड्या धावतात. फलाट क्रमांक १४ ते १८ वरून २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस धावतात. २४ डब्यांच्या रेल्वेसाठी केवळ पाच फलाट उपलब्ध असल्याने आता फलाट क्रमांक १० ते १३ क्रमांकाच्या फलाटाचे विस्तारीकरण करण्याचा रेल्वेचा मानस आहे.
सीएसएमटीवरील फलाट क्रमांक १० ते १३ चे विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गाडीला आणखी सात डबे जोडता येतील. या चार फलाटांवरून दररोज १० गाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन करता येईल. एका गाडीतून साधारण पाच हजार प्रवाशांचा फायदा होईल, तसेच प्रतीक्षा यादीदेखील कमी होईल. पर्यायाने प्रवासी वाढल्याने रेल्वेच्या महसुलातही वाढ होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
६३ कोटींचा निधी मंजूर
दरम्यान, सध्या चार फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम मंजूर झाले आहे. यासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ६३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या कामाचा पहिला टप्पा मार्च २०२३ आणि दुसरा टप्पा मार्च २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06267 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..