NCERT : ‘एनसीईआरटी’चा निर्णय; दहावीच्या पुस्तकातून ‘लोकशाही’ विषय वगळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCERT Books
दहावीच्या पुस्तकातून ‘लोकशाही’ विषय वगळला

NCERT : ‘एनसीईआरटी’चा निर्णय; दहावीच्या पुस्तकातून ‘लोकशाही’ विषय वगळला

मुंबई : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील घडामोडी आणि इतिहासातील अनेक महत्त्वाची प्रकरणे वगळण्याचे प्रकार सुरू असतानाच, आता राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) दहावीच्या लोकशाही विषयातील काही भाग पुस्तकातून वगळला आहे.

विद्यार्थ्यांवरील अभ्‍यासक्रमाचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले. मात्र, याविरोधात देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘एनसीईआरटी’ने आतापर्यंत दहावीच्या पाठ्यपुस्तकातून घटकांचे नियतकालिक वर्गीकरण, लोकशाही, लोकशाहीसमोरील आव्हाने हे भाग आणि सोबतच राजकीय पक्षांसंदर्भातील असलेले पूर्ण पानच अभ्‍यासक्रमातून काढून टाकले आहे.‍

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी आम्ही हे विषय कमी केल्याचे ‘एनसीईआरटी’कडून स्पष्ट करण्यात आले. लोकशाही या विषयाबरोबरच ‘एनसीईआरटी’ने विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून तीन धडेही वगळले आहेत. यात घटकांचे नियतकालिक वर्गीकरण, सोर्स ऑफ एनर्जी, ऊर्जास्रोत आणि नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन या धड्यांचा समावेश आहे.

‘एनसीईआरटी’ने सोशल स्टडीजच्या पाठ्यपुस्तकातून डेमोक्रॅटीक पॉलिटिक्स-१ हा धडा काढला आहे. या धड्यात पॉप्युलर स्ट्रगल्स अॅण्ड मूव्हमेंट, पॉलिटिकल पार्टीज अॅण्ड चॅलेंजेस टू डेमोक्रॅसी हा भाग अभ्यासायला होता. विद्यार्थ्यांनी अकरावी, बारावीत या पाठाशी संबंधित विषयांची निवड केली तरच ते हा विषय शिकू शकतात, असेही ‘एनसीईआरटी’ने म्हटले आहे.

‘गरज नसल्याने वगळले’
विज्ञान आणि इतर विष‍यासाठी ‘एनसीईआरटी’ने आपला खुलासा करीत काठीण्य पातळी, एकसमान माहिती, आजच्या काळात त्या माहितीची गरज नसल्याने हे पाठ अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. तसेच, इयत्ता नववीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील ‘आपण आजारी का पडतो’ हा धडाही हटविण्यात आला. या धड्यातून विद्यार्थ्यांना काही विषाणू आणि हवेतून पसरणाऱ्या आजाराची माहिती मिळत होती, असाही दावा करण्यात आला आहे.

टॅग्स :sscNCERT