
शेअरबाजारात कोट्यवधीचा चुराडा
शेअरबाजारात कोट्यवधीचा चुराडा
मुंबई, ता. १३ : भारतीय शेअर बाजारात आठवडाभरात निर्देशांकाची चांगलीच दाणादाण उडाली. सलग पाचही दिवस झालेल्या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे आठवडाभरात तब्बल २६ लाख कोटी, तर महिन्याभरात ३४ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. महिन्याभरात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल पाच हजार ५०० अशांनी कोलमडला, तर गेल्या तीन महिन्यात तब्बल १० टक्के पडझड नोंदवण्यात आली.
यंदाच्या वर्षात भारतीय शेअर बाजाराला देशांतर्गत घडामोडींसह जागतिक घडामोडींचा मोठा फटका बसला. रशिया-युक्रेन युद्ध, इंधन दरवाढ, महागाईचा भडका, त्यापाठोपाठ जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात केलेल्या बदलाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर प्रकर्षाने जाणवला. दुसरीकडे चीन व अन्य देशांत कोरोनाने पुन्हा डोकेवर काढल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवत आहेत. परिणामी गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळला आहे. शेअर बाजारातील सततच्या अस्थिरतेमुळे परकीय गुंतवणूकदारांनीही भारतीय शेअर बाजारातून नफावसुलीला प्राधान्य दिले. त्यामुळे ३ जानेवारी २०२२ ला ५९,१८२ अंशांवर असलेला सेन्सेक्स आज (ता. १३) ५२,७९३ अंशांवर येऊन ठेपला आहे.
आठवडाभरात शेअर बाजारात सर्वात मोठी पडझड झाली ती गुरुवारी. सेन्सेक्स-निफ्टी दोन्हीही जवळपास दोन टक्क्यांनी कोसळले. गुरुवारी एकाच दिवसात गुंतवणूकदारांना तब्बल पाच लाख कोटींचा फटका बसला. दरम्यान, पुढील काही दिवस बाजारातील घसरण कायम राहणार असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात शेअर बाजाराचा वाढलेला फुगा महागाईमुळे फुटणार असल्याची चिन्हे आहेत. कारण १९ ऑक्टोबर २०२१ रोजी सेन्सेक्स तब्बल ६१ हजार अंशांच्या पार होता, तो आता ५२ हजारांच्या नजीक पोहोचला आहे.
चौकट
अनेक कंपन्यांचे बाजारमूल्य घटले
सततच्या घसरणीमुळे बीएसईवरील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य कमी झाले आहे. २९ एप्रिलला २६६.९७ लाख कोटी रुपये असलेले बाजारमूल्य १२ मे रोजी २४१.१३ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले. त्यामुळे अवघ्या आठवडाभरात गुंतवणूकदारांचे २६ लाख कोटींचे नुकसान झाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82176 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..