निर्देशांक पुन्हा घसरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांक पुन्हा घसरले
निर्देशांक पुन्हा घसरले

निर्देशांक पुन्हा घसरले

sakal_logo
By

शेअर निर्देशांकात पुन्हा घसरण
मुंबई, ता. १३ ः जागतिक तसेच देशी आर्थिक परिस्थितीच्या चिंतेमुळे आज भारतीय शेअरबाजार निर्देशांकांमध्ये पुन्हा घसरण झाली. सेन्सेक्स ३९०.५८ अंश, तर निफ्टी १०९.२५ अंशांनी घसरला. निफ्टीने आज सतरा हजारांचा स्तर कसाबसा राखला.
मागील तीन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स बुधवारी सावरला होता. मात्र, ती तेजी अल्पजीवी ठरल्याचे आजच्या घसरणीवरून पुन्हा दिसून आले. आज सकाळी व्यवहार सुरू होतानाच बाजार तोटा दाखवीतच उघडले. त्यानंतर दिवसभरात तो तोटा आणखीन वाढत गेला. दिवसअखेरीस सेन्सेक्स ५७,२३५.३३ अंशांवर, तर निफ्टी १७,०१४.३५ अंशांवर स्थिरावला.
देशांतर्गत किरकोळ चलनवाढ हे मुख्य चिंतेचे कारण ठरले. तसेच ऑगस्टमध्ये घसरलेले औद्योगिक उत्पादन हेही बाजारासाठी प्रतिकूल ठरले. त्यातच अमेरिकेच्या चलनवाढीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिल्याने त्यांनी सावध भूमिका घेतली होती. आज बँका, ऊर्जा निर्मिती आणि बांधकाम या क्षेत्रांचे शेअर घसरले; तर धातू निर्मिती आणि आरोग्य क्षेत्रांचे शेअर वाढले. रशियाच्या ॲल्युमिनियमवर अमेरिका बंदी घालण्याची शक्यता असल्यामुळे वेदांत, हिंदाल्को, नालको या शेअरचे भाव वाढले; तर महसूल कमी होण्याचा इशारा दिल्यामुळे अदाणी विल्मरचा शेअर आज घसरला.
------------------
या शेअर्समध्ये चढ-उतार
आयटी क्षेत्राबद्दल सर्वांना अपेक्षा होत्या. मात्र त्यांचेही निकाल संमिश्र आल्यामुळे त्यांच्या शेअरचे भाव आज वरखाली झाले. आज विप्रो सात टक्क्यांनी कोसळला. स्टेट बँक, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, एअरटेल या शेअरचे भाव एक ते दोन टक्के पडले. सनफार्मा एक टक्क्यानी वाढला, तर रिलायन्स इंडस्ट्रीज, डॉक्टर रेड्डीज लॅब, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले, टीसीएस या शेअरचे भाव किरकोळ वाढले.