
‘एसआरएम’च्या विद्यार्थ्याला ॲमेझॉनकडून एक कोटीचे पॅकेज
ॲमेझॉन जर्मनीकडून
पुरंजयला कोटीचे पॅकेज
चेन्नई, ता. १९ ः ॲमेझॉन जर्मनीकडून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या कामासाठी पुरंजय मोहन यांची निवड करण्यात आली. पुरंजय एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी असून, त्याला कंपनीकडून वार्षिक एक कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या पॅकेजपैकी हे आतापर्यंतचे सगळ्यात मोठे पॅकेज असल्याचे एसआरएमआयएसटीचे कुलगुरू सी. मुथामिझचेलावन यांनी सांगितले. या सर्वोत्तम यशाबद्दल त्याला ‘नामांकित विद्यार्थी’ या पुरस्काराने सन्मानित केले. संस्थेने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यादरम्यान एक हजारांहून अधिक कंपन्यांनी ‘एसआरएमआयएसटी’ला भेट दिली. १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना रोजगारही मिळाला. या आधीही संस्थेतील दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे पॅकेज मिळाले होते. परंतु, यावर्षी मिळालेले पॅकेज हे भारतातील कोणत्याही खासगी विद्यापीठात दिलेली सर्वोच्च ऑफर आहे. संस्थेतील आठ हजार विद्यार्थ्यांनी मागीलवर्षी कॅम्पस प्लेसमेंट मिळाले होते, या वर्षी हा आकडा १० हजारांवर पोचला असून, पॅकेजची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे संस्थेने स्पष्ट केले.