शहरी भागात डेंगीचा उद्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरी भागात डेंगीचा उद्रेक
शहरी भागात डेंगीचा उद्रेक

शहरी भागात डेंगीचा उद्रेक

sakal_logo
By

शहरी भागात डेंगीचा उद्रेक

आरोग्य विभाग ः मुंबई, नाशिक, नागपूरमध्ये प्रमाण सर्वाधिक

पुणे, ता. १४ : राज्यातील ग्रामीण भागापेक्षा शहरांत डेंगीचा डंख वाढत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागाने नोंदविले आहे. मुंबईत डेंगीचा सर्वाधिक उद्रेक असून, त्याखालोखाल नाशिक आणि नागपूर शहरांत रुग्ण वाढले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी डेंगीमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली असल्याचेही अधोरेखित झाले आहे.
शहरात पावसाळा सुरू झाल्यापासून डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते. साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंगीच्या डासांची पैदास होते. या वर्षी ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांत डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढली असल्याचे दिसते.

डेंगी वाढीची कारणे
शहरांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींचे पाणी घर, सोसायटी, कार्यालयांच्या परिसरात साचते. नारळ, करवंट्या, फुटलेल्या काचा, बाटल्या, टायर, भंगार साहित्य यात साचलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची पैदास होते. त्यातून डेंगीचे रुग्ण वाढतात. त्यातही २५ ते ३५ वर्षे वयोगटातील रुग्ण सर्वाधिक असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.

डेंगी कशामुळे होतो?
डेंगी हा विषाणूजन्य आजार आहे. ‘एडीस इजिप्ती’ या डासाच्या मादीपासून विषाणूंचे संक्रमण होते. हा डास दिवसा चावतो. संसर्ग झालेल्या मादीने घातलेल्या अंड्यांतून निघालेल्या डासांमध्येही हा विषाणू असतो. त्यामुळे त्याचा संसर्ग वेगाने होतो. हा डास लहान, काळ्या रंगाचा असून, त्यावर पांढरे चट्टे असतात.

डेंगी तापाची लक्षणे
- फणफणून ताप
- डोके दुखणे
- डोळ्यांच्या मागील भागात वेदना
- स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना
- चव आणि भूक नष्ट होणे

प्रतिबंधात्मक उपाय
- घरात किंवा घराबाहेर उघड्यावर पाण्याचा साठा फार दिवस ठेवू नये
- ज्या भाड्यांमध्ये पाणी साठवत असू, ती भांडी वेळोवेळी स्वच्छ करावीत
- घरात डास येऊ नयेत, यासाठी सायंकाळी थोडा वेळ घराच्या खिडक्या व दारे बंद ठेवावीत
- इमारतीवरील पाण्याच्या टाक्याही वेळोवेळी स्वच्छ कराव्यात

राज्यातील डेंगी रुग्ण
वर्ष ............ रुग्ण ............. मृत्यू
२०२३ .......... ७३५१ ............... २
२०२२ .......... ४७८४ ............... १८

या जिल्ह्यांत वाढले रुग्ण
सिंधुदुर्ग (३४५), पालघर (३००), कोल्हापूर (३००), नागपूर (२४१), सातारा (१४४), गडचिरोली (१२३), नगर (१४४), छत्रपती संभाजीनगर (१०८), सोलापूर (१०७), रत्नागिरी (१०६)

या महापालिका क्षेत्रात वाढ
मुंबई (२४२५), नाशिक (२९७), नागपूर (२९१), ठाणे (१८०), कल्याण (१५०), सांगली (१४९), कोल्हापूर (१४१), सोलापूर (१०६), अमरावती (१०६), पिंपरी चिंचवड १००, पुणे (८७).

कोट
या वर्षी शहरी भागात विशेषतः महापालिका कार्यक्षेत्रात ६१ टक्के रुग्णसंख्या आढळून येत आहे. परंतु, मृत्यू संख्येत घट दिसून येत आहे.
- डॉ. प्रतापसिंह सारनिकर, सहसंचालक, हिवताप हत्तीरोग विभाग, सार्वजनिक आरोग्य खाते

या वर्षी थांबून-थांबून येणाऱ्या पावसामुळे डासांच्या उत्पत्ती स्थानांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णसंख्या वाढीत झाल्याचे दिसून येते.
- डॉ. महेंद्र जगताप, राज्य कीटक शास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विभाग