भूजलाचे नियोजन समावेशक निकषांवर असावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूजलाचे नियोजन समावेशक निकषांवर असावे
भूजलाचे नियोजन समावेशक निकषांवर असावे

भूजलाचे नियोजन समावेशक निकषांवर असावे

sakal_logo
By

33463
पुणे ः भूजल पुनर्भरण आणि व्यवस्थापनासाठीच्या विचारमंथन कार्यशाळेत सहभागी मान्यवर व इतर.

भूजलाचे नियोजन समावेशक निकषांवर असावे
पुण्यातील विचारमंथन कार्यशाळेत तज्ज्ज्ञांची मते

पुणे, ता. २८ : शहरातील पाण्याचे नियोजन हा विषय सर्व समावेशक निकषांवर होणे आवश्यक आहे. एकाच ठिकाणी पाण्याचे पुनर्भरण, संकलन-साठवण आणि उपचार प्रक्रिया न होता त्याचे विकेंद्रीकरण झाल्यास पाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, असे मत आयआयटी पवईचे प्रा. डॉ. प्रदीप काळबर यांनी व्यक्त केले. शाश्वतता आणि परिवर्तनशील तत्त्वावर आधारित शहरांचा नियोजन आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरांचा विकास होताना भूजल संपत्तीचे संकलन, संवर्धन आणि योग्य व्यवस्थापन होण्यासाठी राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत एक दिवसीय कार्यशाळा ‘भूजल भवन’ येथे झाली. राज्याचे भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेत नगररचना पुणे विभागाचे संचालक अविनाश पाटील प्रमुख पाहुणे होते. राज्य व केंद्र शासनाचे विविध विभाग, विद्यापीठे व विद्यापीठांशी संलग्न नामवंत संस्थांनी यात सहभाग घेतला.
चेन्नईतील अण्णा विद्यापीठाचे प्रा. डॉ. एलांगो लक्ष्मणन यांनी तेथील भूजल व्यवस्थापनाचे अभ्यासपूर्वक अनुभव सांगितले. बृहन्मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पाणी व आपत्ती व्यवस्थापन योजनेबाबत कार्यकारी अभियंता कोटकर व अजित देशमुख यांनी माहिती दिली. शहरी भागातील वाढती लोकसंख्या आणि नव्याने निर्माण होणारे पाणी प्रश्न पाहता भूजल विभागामार्फत शहरी भागातील भूजलाचे पुनर्भरण व व्यवस्थापन हा विषय प्राधान्याने हाताळून कायद्यामध्ये तरतूद करणे जरुरीचे राहील, असे मत जोशी यांनी व्यक्त केले. शहरांमधील भूजलाच्या मूल्यांकनासाठी पाणीपातळी, पर्जन्यमान आदींचे मोजमाप करणे व माहिती गोळा होण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे आवश्यक आहे, असे डॉ. विजय पाखमोडे यांनी नमूद केले. संशोधन व विकास कक्षाचे उपसंचालक डॉ. प्रमोद रेड्डी यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रीय विज्ञान प्रकल्पाच्या उपसंचालक भाग्यश्री मग्गीरवार यांनी प्रास्ताविक केले.

भूजलाची उपलब्धता व गुणवत्ता इत्यादींसाठी जीआयएस प्रणालीचा वापर होणे गरजेचे आहे. शहरांलगतच्या गावांचादेखील भूजल पुनर्भरणासाठी विचार करावा. तसेच सर्वांगीण निकषांवर आधारित शहरी व निमशहरी भाग पथदर्शी स्वरूपात राबवून मॉडेल विकसित करता येऊ शकते.
- अविनाश पाटील, संचालक, नगररचना विभाग
-------------
पुणे ः भूजल पुनर्भरण आणि व्यवस्थापनासाठीच्या विचारमंथन कार्यशाळेत सहभागी मान्यवर व इतर.