रत्नागिरी तालुक्‍यात सापडली कासवांची अंडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

रत्नागिरी/पावस - कासवांच्या अंड्यांच्या चोरीमुळे रत्नागिरी तालुक्‍यात फारशी अंडी आढळत नाहीत. मात्र निसर्गयात्री संस्थेला गावखडी समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची अंडी शोधण्यात शनिवारी यश आले. दोन खड्ड्यांमध्ये 142 व 130 एवढी अंडी मिळाली.

रत्नागिरी/पावस - कासवांच्या अंड्यांच्या चोरीमुळे रत्नागिरी तालुक्‍यात फारशी अंडी आढळत नाहीत. मात्र निसर्गयात्री संस्थेला गावखडी समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची अंडी शोधण्यात शनिवारी यश आले. दोन खड्ड्यांमध्ये 142 व 130 एवढी अंडी मिळाली.

वन विभाग व पोलिसांच्या मदतीने अंड्यांचे संरक्षण केले जाणार आहे.
"निसर्गयात्री'चे सुधीर रिसबूड म्हणाले की, संस्थेतर्फे तीन वर्षांपासून कासवाची अंडी वाचवण्यासाठी मेहनत घेतली जात आहे. त्यानुसार किनाऱ्यावरील गावांमध्ये चौकशी करून लक्ष ठेवले जात होते. गेले पंधरा दिवस-रात्र प्रदीप डिंगणकर, ग्रामस्थ राकेश पाटील व संकेत पाटील यांनी लक्ष दिल्याने किनाऱ्यावर प्रथमच अंडी सापडली. याकामी सरपंच कांचन आमरे, उपसरपंच अभय तोडणकर यांचे सहकार्य लाभले.

समुद्रकिनाऱ्यावर कासवांनी केलेले खड्डे आज सकाळी आढळल्यानंतर तत्काळ वन विभागाला कळविण्यात आले. वन विभाग व पोलिसांनी दोन ठिकाणी खड्डे खोदून अंडी आपल्या सुरक्षेखाली ठेवली. सागरी पोलिसांनी त्याची पूर्ण वाढ होईपर्यंतची जबाबदारी घेतली आहे.

ऑलिव्ह रिडले संकटात
चिपळूणच्या सह्याद्री मित्र संस्था कासव बचाव मोहीम राबवते. वेळास येथे कासव महोत्सवही होतो; परंतु अनेक लोक कासवाची अंडी खातात, चोरी करतात, तसेच कातडी व तेल काढण्यासाठी हत्या केली जात असल्याने अंडी सापडत नाहीत. मात्र, यामुळे ऑलिव्ह रिडले जात संकटात आहे. या कासवांना भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मधील अनुसूची 1 अन्वये संरक्षित केले आहे. मात्र, गावखडीपासून कासव संरक्षण मोहीम सुरू झाली आहे.

Web Title: tortoise egg receive