गतिरोधकाचा अंदाज न आल्याने 'हा' पर्यटक मुकला जिवाला..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

त्याला गतिरोधकाचा आला नाही अंदा़ज आणि या पर्यटकाला गमवावे लागले आपले प्राण....

वेंगुर्ले (सिंधुदूर्ग) : गतिरोधकाचा अंदाज न आल्याने मोटारसायकलचा अपघात होऊन विदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला. ही घटना शिरोडा-राऊतवाडी येथे आज पहाटे घडली. कोनस्ट्रेंटिन कार्यालिनीचेव (वय ३०, रा. कझाकीस्तान) असे मृताचे नाव आहे.

याबाबत येथील पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. आरवली येथून गोवाच्या दिशेने जात असताना या पर्यटकाच्या दुचाकीला अपघात झाला. कोनस्ट्रेंटिन हा आपल्या इव्हेंजर (डीएल ८९ बीजे ९४६७) मोटारसायकलने पहाटे गोव्याकडे जात होते. राऊतवाडी येथे असलेल्या गतिरोधकाचा त्यांना अंदाज आला नाही. ताबा सुटून ते दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. या पर्यटकाच्या मागे दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या पर्यटकाने त्वरित राऊतवाडी येथील अपघात स्थळाच्या जवळपास असलेल्या ग्रामस्थांच्या घरी धाव घेत मदतीसाठी आवाहन केले.

हेही वाचा- सावधान : फॅशन म्हणून किल्ला भटकंतीस येताय...... -

ग्रामस्थांनी केला प्रयत्न मात्र...

यावेळी घटनास्थळी येथील ग्रामस्थ अमित राऊत, गौरव राऊत, विठ्ठल राऊत, विवेक पवार, विनोद राऊत, सिद्धेश राऊत यांनी त्याला त्वरित येथील बाबल गावडे व पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब यांच्या मदतीने त्या पर्यटकाला रुग्णवाहिकेतून शिरोडा उपजिल्हा रुग्णालय दाखल केले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.  याबाबत सिद्धेश परब यांनी तत्काळ वैद्यकीय अधिकारी व पोलिसांशी दूरध्वनीवरून संपर्क केला व अपघाताची महिती दिली.

हेही वाचा- या विदयापीठाच्या दीक्षांत समारंभात असणार खादीचा ड्रेसकोड.. -
या अपघातात पर्यटकाच्या ताब्यातील दुचाकी इव्हेंजरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत येथील पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक श्री. पाटील, हवालदार गजेंद्र भिसे करत आहेत.

हेही वाचा- शास्त्रीनगरात ऍड. पानसरेंचे स्मारक कधी होणार? -

गतिरोधक बनले धोकादायक
शिरोडा ते रेडी या मार्गावर मायनिंग वाहतुकीमुळे १०० ते १५० मीटर अंतरावर गतिरोधक बसवण्यात  आले आहेत. या मार्गाने बऱ्याच देशी-विदेशी पर्यटकांची ये-जा सुरू असते. गोव्यावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक शिरोडा वेळागर या ठिकाणी येतात. या गतिरोधकांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारले नसल्याने या पर्यटकांना याच अंदाज येत नाही व याच कारणामुळे अपघात होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist Death Accident In Vengurla Kokan Marathi News