मांगेली गावचे लपलेले सौंदर्य

मांगेली गावचे लपलेले सौंदर्य

दोडामार्ग - श्रावणात हिरवाईने नटलेला परिसर, धुक्‍यात गडप झालेले डोंगर, डोंगरमाथ्यावरून फेसाळत कोसळणारा नयनरम्य धबधबा, डोंगर पठारावरून तिलारी धरणाचे दिसणारे विहंगम दृश्‍य हे सर्व निसर्गसौंदर्य आहे, दोडामार्ग तालुक्‍यातील मांगेली गावात. वर्षापर्यटनामुळे हे गाव सहा-सात वर्षांत बऱ्यापैकी चर्चेत आले. पण, याच्या केवळ धबधब्याचीच पर्यटकांना ओळख आहे. याही पलीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील सडा डोंगरावरील धबधबा, गुहा, किल्ला ही पर्यटनाचा विकास करण्याची क्षमता असलेली स्थळे अद्याप नजरेआड आहेत.

दोडामार्ग तालुक्‍याच्या ठिकाणापासून २५ किलोमीटर अंतरावर मांगेली धबधबा आहे. डोंगरामधून वेडीवाकडी वळणे पार करत दोडामार्गातून पाऊण ते एक तासात मांगेलीला पोचता येते. मांगेली गावात तळेवाडी, कुसगेवाडी, फणसवाडी, देऊळवाडी अशा एकूण चार वाड्या असून, पैकी फणसवाडीत हा नयनरम्य मांगेली धबधबा आहे.

हा धबधबा काही वर्षापूर्वी वृत्तपत्रांमुळे पर्यटकांच्या नजरेत आला. सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांबरोबरच बेळगाव तसेच गोवा राज्यातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येथे असतात; पण या धबधब्याच्या पलिकडे पर्यटकांना भुरळ पाडतील अशी स्थळे आहेत. अर्थात साहस करण्याची क्षमता असलेल्या पर्यटकांनाच तेथे पोचता येईल.

मांगेलीच्या वरच्या भागात कर्नाटकची सीमा आहे. येथून वर चालत जावून सडा गाव गाठता येते. मांगेलीतून तीन ते चार किलोमीटरवर ओहोळ, नाल्यांची आणि झाडाझुडुंपांनी वेढलेली वाट पार करून सडा धबधब्याजवळ पोचता येते. हा भाग उंचावर असल्याने जाताना गोव्यातील अंजुणा धरणही या डोंगरावरून पाहायला मिळते. मांगेली धबधब्याप्रमाणेच हाही धबधबा नयनरम्य असून, ज्या ठिकाणी पाणी कोसळते तो भाग खोल नसल्याने वेगाने अंगावर पडणारे तुषार झेलत आंघोळीचा मनमुराद आनंद लुटता येतो. हा धबधबा डोंगरावर तसेच मुख्य रस्त्यापासून दूर असल्याने काहीसा दुर्लक्षित राहिला आहे. तरीही उत्साही तरुण पर्यटक स्थानिक गाईडच्या मदतीने या ठिकाणी पोचतात. तीन ते चार किलोमीटर पायपीट आणि पाऊणतास वेळ लागत असला तरी, एकदा का या धबधब्याजवळ पोचल्यानंतर मात्र सारा क्षीण दूर होतो.

मांगेली धबधब्याव्यतिरिक्‍त या ठिकाणी पाहण्यासारखे आणखी एक पर्यटनस्थळ म्हणजे मांगेली तळेवाडीच्या वरच्या बाजूला असलेल्या सडा डोंगरावर असलेल्या दोन गुहा आहेत. जवळपास डोंगरावरून तीन-चार किलोमीटर अंतर कापून येथे पोचता येते. या गुहा भव्य स्वरुपाच्या आहेत. या गुहा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात आहेत.

सडा डोंगरावर गोविंदगड हा किल्ला आहे; मात्र काळाच्या ओघात या किल्ल्याच्या भिंतींची दैनावस्था झाली आहे. या किल्ल्याचे संवर्धन झाले नसल्याने भिंती पडल्या असून, त्यावर झाडेझुडुपे, वेली वाढलेल्या आहेत. तसेच या किल्ल्यावर गुप्त विहिरी व तोफखानाही आहे. हा किल्ला जवळपास दोन किलोमीटर अंतरावर पसरला आहे. या किल्ल्यावर खोल्यांची रचनाही पाहायला मिळते. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचेही वास्तव्य होते, असे स्थानिक सांगतात; मात्र नंतरच्या काळात हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडे होता.  

सडा डोंगरावरील परिसरात वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या शिवकालीन विहिरी आढळतात. या विहिरींची रचना वरून चौकोनी व आतील भाग हा वर्तुळाकार आहे. या विहिरींना बारमाही पाणी असते. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या देखील बांधल्या आहेत. या प्रकारच्या जवळपास ५० विहिरी या भागात असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात; मात्र काळाच्या ओघात काही विहिरी मुजल्या आहेत. या विहिरींच्या बाजुला घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी छोटेसे हौद 
पाहायला मिळतात. 

कसे जाल..? 

  •   दोडामार्गपासून २५ किलोमीटरवर मांगेली आहे. तेथून खासगी वाहन किंवा एसटीने येथे जाता येते.
  •   कोल्हापूरहून रामघाट मार्गे येणाऱ्यांना साटेली भेडशीतून मांगेलीकडे वळता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com