सावडाव धबधबा मनात करतो घर

राजेश सरकारे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

कणकवली - अजस्र खडकावरून खाली कोसळणारा, फेसाळणारा सावडाव धबधबा मनाच्या कोपऱ्यात कायमचे स्थान मिळवून जातो. सुंदर, नयनरम्य असलेल्या या धबधब्याचा प्रवास गर्द वनराईतून सुरू होतो. तळकोकणातील सौंदर्याचे एकत्रित चित्र साकारावे तसा हा धबधबा आहे.

कणकवली - अजस्र खडकावरून खाली कोसळणारा, फेसाळणारा सावडाव धबधबा मनाच्या कोपऱ्यात कायमचे स्थान मिळवून जातो. सुंदर, नयनरम्य असलेल्या या धबधब्याचा प्रवास गर्द वनराईतून सुरू होतो. तळकोकणातील सौंदर्याचे एकत्रित चित्र साकारावे तसा हा धबधबा आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर शहरापासून मुंबईच्या दिशेने पाच किलोमीटर, तर नांदगाव तिठ्यावरून सहा किमी. अंतर पार केले की, सावडाव फाटा अर्थातच सावडाव धबधब्याकडे जाणारा मार्ग सुरू होतो. जून ते ऑक्‍टोबर या दरम्यान धबधब्यापर्यंत असलेला परिसर पर्यटक आपल्या कॅमेऱ्यात साठवून ठेवत असतात. कधी घनदाट जंगल, तर कधी रस्त्यालगत वसलेल्या वाड्या, मध्येच उंच डोंगरावर वसलेले कौलारू घर, वळणावळणाचा नागमोडी रस्ता, दोन्ही बाजूला असणारी भातशेती, प्राथमिक शाळा, पर्यटकांचे स्वागत करणारी भव्य कमान आणि त्यानंतर धबधब्याच्या प्रवेशद्वारावर पर्यटन कर भरल्यानंतर वाहनचालकांना धडकी भरवणारा धबधब्याचा चढाव लागतो. हा चढाव पार केल्यानंतर थेट सावडाव धबधब्याच्या शिखरावर पोचता येते.

सावडाव आणि माईण गावाच्या डोंगरमाथ्यावर या नदीचा उगम आहे. कातळावर साठलेले पावसाचे पाणी एकत्र होत मोठा प्रवाह होतो. पुढे हा प्रवाह एका अजस्र खडकावरून खाली कोसळतो आणि सावडावच्या सुंदर नयनरम्य धबधब्याचा प्रवास गर्द वनराईतून सुरू होतो. निसर्ग सौंदर्याबरोबरच फेसाळत खाली कोसळणारा हा धबधबा जिल्ह्यातील व बाहेरील पर्यटकांचे खास आकर्षण आहे. नदीच्या उगमापासूनचा सुमारे ७ किलोमीटरचा पट्टा गावाला कृषी क्षेत्राबरोबरच पर्यटनदृष्ट्या समृद्ध करणारा आहे.

सावडाव धबधब्याला फारशी उंची नसली तरी धबधब्याची रुंदी पर्यटकांना मोठा आनंद देणारी ठरते. आंबोलीचा धबधबा खूप उंचावरून कोसळतो. यामुळे इथे वरून दगड कोसळल्यास मोठी दुखापत होण्याची शक्‍यता असते; मात्र ती शक्‍यता सावडावमध्ये नाही. सुमारे ६० ते ७० फूट रुंदीचे आणि ३० फूट उंचीचे हे काळे कातळ जेव्हा धबधब्याखाली जाते तेव्हा पांढऱ्या शुभ्र दुधाचे घट कोसळतात की काय असा भास होतो. धबधब्याच्या वरच्या बाजूला अत्यंत संथपणे वाहणारे पाणी जेव्हा या खडकावरून खाली झेपावते तेव्हाचे चित्र मनातल्या आतील कप्प्यात कायमचे बंद करून ठेवावे इतपत सुंदर, गर्द हिरवी वनराई, त्यावर पसरलेल्या सुंदर हिरव्या वेली, रंगीबेरंगी फुले, त्यावर बागडणारी फुलपाखरे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यात या धबधब्याचे खळखळ गीत सारे काही स्वप्नवतच.

गुहेचे आकर्षण
धबधब्याच्या डाव्या बाजूला एक मोठी गुहा आहे. या गुहेत जाऊन आपलं साहस आजमावण्यासाठी अनेक युवा पर्यटक नेहमीच धडपडत असतात. एकावेळी सुमारे ७० ते ८० लोक राहतील एवढी मोठी ही गुहा आहे. याचबरोबर धबधब्यात मध्यभागी एक झाड आहे. हे झाड गेली कित्येक वर्षे उभे असून, या नदीला कितीही पाणी आले तरी ते वाकत नाही किंवा पडत नाही. दरवर्षी आणखीन मजबूत होत जाणारे हे झाडही पर्यटकांचे खास आकर्षण आहे.

कसे याल

  •   कणकवलीपासून ६ किलोमीटरवर असलेल्या सावडाव फाट्यावरून  पुढे तीन किलोमीटरवर गाव लागतो.
  •   येथे जाण्यासाठी खासगी वाहने, रिक्षा याचा वापर करावा लागतो.

कुठे राहाल?
सावडाव परिसरात हॉटेलची व्यवस्था नाही. त्यांना कणकवलीतच मुक्काम करावा लागेल. तिथे चांगली व्यवस्था आहे.

 

Web Title: Tourist spot Savdav waterfall in Konkan