वाशिष्ठीचे बॅकवाॅटर, क्रोकोडाईल सफारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 जानेवारी 2019

चिपळूण - मुंबई -गोवा महामार्गावरील विसावा पॉइंट, वाशिष्ठी खाडीचे सर्वांना आकर्षण आहे. गोवळकोट ते दाभोळ या प्रवासात बॅकवॉटर, आयलॅंड पार्क आणि क्रोकोडाईल सफारीचा खराखुरा व सुखद आनंद घेता येतो.

चिपळूण - मुंबई -गोवा महामार्गावरील विसावा पॉइंट, वाशिष्ठी खाडीचे सर्वांना आकर्षण आहे. गोवळकोट ते दाभोळ या प्रवासात बॅकवॉटर, आयलॅंड पार्क आणि क्रोकोडाईल सफारीचा खराखुरा व सुखद आनंद घेता येतो.

मुंबईहून गोव्याला जाताना विश्रांतीचे पारंपरिक मध्यवर्ती ठिकाण म्हणून चिपळूणची ओळख आहे. तालुक्‍यात १०० किमीच्या पट्ट्यात खाडी, डोंगर, बॅकवॉटर, किल्ले, निसर्ग, जंगल, संस्कृती, लोककला, हेरिटेज अशी अमर्याद पर्यटन समृद्धी एकवटली आहे. 

निसर्गसौंदर्याची मुक्तहस्ते उधळण, विकासाची झेप घेण्याची प्रचंड क्षमता असलेल्या या तालुक्‍यातून वाहणारे वाशिष्ठीचे
बॅकवॉटर, दऱ्या-खोऱ्या पर्यटकांना आकर्षित करत आहेत. 
महामार्गावरील विसावा पॉइंट, वाशिष्ठी खाडीचे सर्वांना आकर्षण आहे. गोवळकोट ते दाभोळ अशा ४४ कि.मी.च्या प्रवासात बॅकवॉटर, आयलॅंड पार्क आणि क्रोकोडाईल सफारी असे पर्यटकांसाठी विविधांगी अनुभव आणि खराखुरा आनंद घेता येतात.

निसर्गसौंदर्य, नितांत सुंदर वाशिष्ठी खाडी, खाडीतील छोटी-मोठी बेटे, सह्याद्रीचे छोटे-मोठे डोंगर आणि खाडीकिनारी निवांत विसावलेल्या मगरींचे दर्शन घेता येते. डेरवण येथील शिवसृष्टीत शिवचरित्रातील चित्तथरारक प्रसंग घटना कलात्मकतेने उभारली आहे. डेरवण येथेच ऑलिंपिक दर्जाच्या क्रीडासंकुलाची उभारणी केली आहे.  गोवळकोट भागात गोविंदगड नावाने ओळखला जाणारा, सात बुरुज, वैशिष्ट्यपूर्ण बांगडी तोफ असलेला गोवळकोट किल्ला हा डोंगरी प्रकारातील आहे. किल्यावर रेडजाई, तर पायथ्याशी श्री देवी करंजेश्वरीचे प्राचीन मंदिर आहे. रावतळे परिसरात विध्यंवासिनीचे पुरातन मंदिर आहे.

कसे जाल....
मुंबई-गोवा आणि गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरच चिपळूण शहर आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातून कुंभार्ली आणि आंबा घाटमार्गे येता येते. पुण्यातील पर्यटकांसाठी भोर घाटमार्गेही येता येते. रेल्वेने वालोपे रेल्वे स्थानकावर उतरून चिपळूणला जाता येते. 

कुठे थांबाल...
शहरात राहण्यासाठी लहान-मोठे ३५ हॉटेल्स आहेत. उच्च व मध्यमवर्गीय श्रेणीतील १५ हॉटेल्स आहेत. खाडीकिनारी होम-स्टेची व्यवस्था आहे. कोकणी खाद्यसंस्कृती जपणारे हॉटेल्स वेगळे आहेत.

कोकण पर्यटन समृद्धीचा राजमार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चिपळूण तालुक्‍यातून जातो. इथली दुर्लक्षित ठिकाणे जगासमोर आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- धीरज वाटेकर, 

   पर्यटक अभ्यासक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist spot Vashisti Backwater Crocodile Safari