तारकर्ली ग्रामस्थांना मुंबई येथून आलेल्या बेधुंद पर्यटकांची मारहाण

tourists beat up local villagers attack in malvan tarkarli sindhudurg
tourists beat up local villagers attack in malvan tarkarli sindhudurg

मालवण (सिंधुदुर्ग) : पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या तारकर्लीत काल रात्री बेधुंद पर्यटकांनी स्थानिक ग्रामस्थांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. पर्यटकांच्या मोटारीने दुचाकीस्वारास धडक दिली. याचा जाब विचारण्यास गेलेल्या ग्रामस्थांना ही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर गावातील ग्रामस्थ संतप्त बनले. त्यांनी पर्यटकांना थेट पोलिसांत नेले. यावेळी दोन पक्षांचे जिल्हास्तरावरील स्थानिक नेते त्या ठिकाणी हजर झाले. पोलिसांत तासभर रंगलेल्या चर्चेनंतर कोणतीही तक्रार न देण्याचा निर्णय झाला. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्याबाहेर ग्रामस्थांची गर्दी झाली होती. 


मुंबई येथून आलेले पर्यटक काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तारकर्ली मार्गावरून माघारी परतत असताना एका दुचाकीस्वरास त्या पर्यटकांच्या गाडीची धडक बसली. स्थानिक ग्रामस्थांनी काही अंतरावर गाडी थांबवून याबाबत जाब विचारला. त्यावेळी गाडीचालक व अन्य व्यक्ती व महिलांनी अर्वाच्च भाषा वापरली. यामुळे वाद निर्माण झाला. तारकर्ली मार्गावरच पर्यटक व स्थानिक यांच्यात वाद भडकला. यावेळी एका स्थानिकास मारहाण करण्यात आली. यामुळे स्थानिक ग्रामस्थ अधिकच संतप्त बनले. वाद वाढला. यावेळी एका स्थानिक ग्रामस्थाच्या डोक्‍यावर दगड मारून रक्तबंबाळ करण्यात आले. पर्यटक गाडीमधील कोणीतरी दगड मारल्याचे स्थानिकांनी सांगितले. एका ग्रामस्थाच्या डोक्‍यावर दगड मारण्याचा प्रकार बेधुंद पर्यटकांकडून घडल्याने बहुसंख्य ग्रामस्थ एकवटले.

स्थानिक महिलाही पुढे आल्या. यावेळी पर्यटक गाडीमधील महिलांनी एका स्थानिक युवतीच्या केसाला धरून ओढले. नखांनी तिच्या हातावर ओरबडले. यामुळे सहनशीलतेचा अंत झालेल्या ग्रामस्थांनी पर्यटकांना पोलिसांत नेत कारवाईची मागणी केली. रात्री उशिरा बहुसंख्य ग्रामस्थ एकवटले होते. पर्यटकांवर कारवाईसाठी ग्रामस्थ एकवटले. यावेळी दोन पक्षांचे नेते त्या ठिकाणी हजर झाले. तासभर पोलिस ठाण्याच्या एका केबिनमध्ये झालेल्या चर्चेअंती दोन्ही बाजूकडून कोणतीही तक्रार नाही, अशी लेखी भूमिका पोलिसांनी नोंद करून घेतली. त्यामुळे कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.

पर्यटकांना लगाम घालणे गरजेचे
मालवणात दरवर्षी लाखो पर्यटक येतात. बहुसंख्य पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटतात, मौजमजा करतात. त्यांचा कुठलाही त्रास स्थानिकांना नसतो; मात्र काही वेळा दारू पिऊन धिंगाणा घालणे, बेदरकार गाड्या चालवणे, अपघात करून पळून जाणे, अरेरावी करणे असे प्रकारही काही पर्यटकांकडून घडतात. बहुतांश वेळा वाद नको, मालवणची बदनामी नको म्हणून स्थानिक व पर्यटन व्यावसायिक शांततेची भूमिका घेतात; मात्र काही बेधुंद पर्यटकांकडून सातत्याने असे प्रकार घडत असतील तर अशा पर्यटकांना लगाम घालणे गरजेचे आहे, असा सूर उमटू लागला आहे.

 संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com